Monday 3 October 2016

जवान चंदु चव्हाण लवकरच परत येतील: पर्रीकर

पुणे - "पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक्‍स) व धुळ्याचे जवान चंदु चव्हाण यांचा पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याचा काहीही संबंध नाही. चव्हाण हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले असून त्यांना माघारी आणण्यासाठी लष्कराच्या कारवाई विभाग महासंचालकांच्या (डीजीएमओ) पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चार दिवसात यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चव्हाण हे लवकरच भारतात परत येतील,‘‘ अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे आयोजित एका कार्यक्रमास पर्रीकर हे उपस्थित होते. 

"पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराची कारवाई झाली, तर चव्हाण हे पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. या दोन्ही घटना वेगवेगळ्या वेळी घडलेल्या आहेत. लष्करी जवान चुकून दुसऱ्या देशाच्या हद्दीत गेल्यास "स्टॅटेजिक सोल्जर एक्‍स्चेंज‘अंतर्गत लष्कर कारवाई करत असते. या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून चव्हाण यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी लष्कर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,‘‘ असे संरक्षण मंत्री म्हणाले.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.बी.शेकटकर समितीच्या अहवालाविषयी पर्रीकर म्हणाले, ""भारतीय लष्कराचे पारंपरिक साहित्य आणि शस्त्रांच्या आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी शेकटकर समिती नेमली होती. या समितीचा अहवाल लवकरच संरक्षण मंत्रालयास मिळेल. त्यानंतर या विषयासंदर्भातील पुढील प्रक्रिया होईल. तसेच फ्रान्स सरकारबरोबर रॅफेल ही लढाऊ विमाने खरेदी करण्यासंदर्भात करारही झाला आहे. त्यानुसार ही विमाने 36 महिन्यांच्या आत भारताला मिळतील.त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे.‘‘
"सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी जागरूक राहावे. आपल्या सभोवताली संशयास्पद वस्तू, अनुचित घटना किंवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करू नये,‘ असे आवाहनही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment