Thursday, 13 October 2016

पाम्पोर साठ तासांनी शांत

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील पाम्पोर येथील उद्योजकता विकास संस्था (ईआयडी) या सरकारी इमारतीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांचा बुधवारी तिसऱ्या दिवशी खात्मा करण्यात लष्कराला यश आले आणि त्याबरोबरच सुमारे 60 तासांहून अधिक वेळ सुरू असलेला गोळीबार थांबला.

लष्कराने ही मोहीम संपल्याचे दुपारी जाहीर केले. सोमवारी (ता. 10) सकाळी हे दहशतवादी या इमारतीत घुसले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 60 तासांपासून काही अंतराने चकमक उडत होती. या चकमकीदरम्यान इमारतीत लपलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामधील एका दहशतवाद्याला काल (मंगळवारी) ठार मारण्यात आले होते आणि दुसऱ्या दहशतवाद्याचा आज मृत्यू झाला.

दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यापूर्वी सुरक्षा दलाने इमारतीच्या सर्व 50 खोल्या तपासून पाहिल्या, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद्यांविषयी सविस्तर माहिती अद्याप हाती लागलेली नाही; मात्र, प्राथमिक माहितीनुसार हे दहशतवादी लष्करे तैयबाचे असल्याचे संकेत मिळत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या इमारतीत दोन ते तीन दहशतवादी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सोमवारी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. पाम्पोरच्या या इमारतीवर दहशतवादी हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही दहशतवाद्यांनी या इमारतीला लक्ष्य केले होते.

दहशतवाद्यांनी सोमवारी इमारतीत प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलाचे लक्ष विचलित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गाद्यांना आग लावली होती. आग लागल्यानंतर सुरक्षा दल काही क्षणांतच तिथे दाखल झाले होते. त्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला होता. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाने इमारतीवर रॉकेट लॉंचर आणि ग्रेनेडचा मारा केला.

घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
लष्कराने जम्मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधार सेक्‍टरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न बुधवारी हाणून पाडला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली. जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली असून, अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

No comments:

Post a Comment