Wednesday, 19 October 2016

'जागतिक अर्थकारणात भारताची महत्त्वाची भूमिका' -- पीटीआय

लुधियाना - जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या कामामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याचसोबत उद्योजकांनी लघुउद्योगांना चालना देऊन दोषविरहीत व पर्यावरणपूरक उत्पादने तयार करावीत, असे सांगत खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही मोदी यांनी या वेळी स्पष्टपणे नमूद केले.

मोदी यांच्या हस्ते दलित व आदिवासी उद्योजकांसाठीच्या एससी-एसटी हबचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मोदी यांच्या हस्ते महिलांना 500 लाकडी चरख्यांचे वाटप या वेळी करण्यात आले. एकेकाळी खादी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून मानले जायचे. आता मात्र खादीची फॅशन झाली आहे, अशी खंतही व्यक्‍त करत मोदी यांनी खादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उद्योजकांना आवाहन केले. मोदी म्हणाले, काळ झपाट्याने बदलतोय. एकेकाळी "खादी फॉर नेशन‘ अशी स्थिती होती, आता "खादी फॉर फॅशन‘ असे चित्र पाहावयाला मिळते; पण या वातावरणात खादी उद्योगांना सोनेरी दिवस आपण देऊ शकतो.

जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंध जोडत मोदी यांनी आता जागतिक बाजारपेठ उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी भारतीय उद्योजकांनी जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न करावेत, असे सांगितले. ते म्हणाले, ‘भारत ही जगातील वेगाने विस्तारणारी एक महत्त्वाची अर्थसत्ता आहे. जागतिक अर्थव्यवस्था गर्त्तेत सापडली असताना तिला सावरण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.‘‘ भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये लघू व मध्यम उद्योगांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही मोदी यांनी या वेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment