Tuesday 18 October 2016

उरी हल्ल्यासाठी शिडीचा वापर - पीटीआय

उरी/नवी दिल्ली - उरीमध्ये घुसखोरी करत 18 सप्टेंबरला हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील विजेचे कुंपण पार करण्यासाठी शिडीचा उपयोग केल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 19 जवान हुतात्मा झाले होते. 

दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा माग काढण्यासाठी लष्करातर्फे सुरू असलेल्या चौकशीमध्ये हे चार दहशतवादी सलामाबाद कालव्याजवळ असलेल्या विजेच्या कुंपणाला शिडी लावून आत आल्याचा निष्कर्ष निघत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चार दहशतवाद्यांपैकी एकाने सलामाबाद कालव्याजवळील कुंपणाच्या तारेमधील जागेतून भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि वीजप्रवाह असलेल्या कुंपणावर शिडी लावली. इतर तीन दहशतवाद्यांनीही दुसऱ्या बाजूने शिडी लावत भारतात घुसखोरी केली. चारही दहशतवाद्यांजवळ बंदुका आणि स्फोटकांनी भरलेल्या मोठ्या आणि जड पाठीवरील पिशव्या असल्याने सर्वांना कुंपणामधील फटीतून आत येणे अवघड होते. या भागात सातत्याने जवानांची गस्त असल्याने फटीतून सर्वांनीच सावकाश येणे त्यांना सोयीचे नव्हते, असा निष्कर्ष चौकशी आणि तपासातून निघत आहे. चारही दहशतवादी भारतीय हद्दीत शिरल्यानंतर पहिल्या दहशतवाद्याने वापरलेली शिडी तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या महंमद कबीर आवान आणि बशारत या दोन मार्गदर्शकांकडे परत करत पुरावा मिटविण्यात आल्याचेही आढळून आले आहे.

घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांनी एक दिवस कोठेतरी आश्रय घेतला असण्याची शक्‍यता असल्याने लष्करातर्फे उरीजवळील गोहल्ला आणि जाबला या गावांमध्ये चौकशी सुरू आहे. घुसखोरी करण्यासाठी शिडीचा वापर झाल्याची घटना उत्तर काश्‍मीरमधील मचिल भागातही याच वर्षांत घडली आहे. उरी हल्ल्याबाबत लष्कराने अंतर्गत चौकशी सुरू केली असून, उरी ब्रिगेड कमांडर के. सोमशेखर यांना हटविण्यात आले आहे.

चौकशी पूर्ण होण्यास लष्कराने कालमर्यादा निश्‍चित केली आहे. चौकशीतील निष्कर्षांबरोबरच भविष्यामध्ये घुसखोरी रोखण्यासाठी काय सुधारणा आवश्‍यक असतील, याबाबतही शिफारशी केल्या जाणार आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट आता घुसखोरीची बेधडक पद्धत वापरत असून, घुसखोरी करताच दिसेल त्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला जात आहे.
इतर काही प्राथमिक निष्कर्ष
- लष्करी तळाला असलेले तारेचे कुंपण एका ठिकाणी कापून दहशतवाद्यांचा प्रवेश
- दहशतवाद्यांकडे उरी तळाचा संपूर्ण नकाशा होता
- दहशतवाद्यांनी तळावरील स्वयंपाकघर आणि गोदामाला बाहेरून कडी घालत आतील जवानांना रोखले
- पाकव्याप्त काश्‍मीरमधून 16 सप्टेंबरच्या रात्री घुसखोरी
- दहशतवाद्यांनी एक दिवस सुखदार या गावी काढत लष्करी तळाची पाहणी केली

No comments:

Post a Comment