Showing posts with label Sakal. Show all posts
Showing posts with label Sakal. Show all posts

Tuesday, 21 March 2017

चंदूसाठी देशाची प्रार्थना देवानं ऐकली...

Indian solider Chandu Chavan's brother Bhushan

भारत-पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची नुकतीच सुटका झाली. चार महिने ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांचा भाऊ भूषण हा देखील भारतीय सैन्यात जवान आहे. चंदू पाकमध्ये अटकेत असताना इकडे भारतात भावाची तगमग सुरू होती. भूषण यांनी हा अनुभव शेअर केलाय eSakal.com चे प्रतिनिधी संतोष धायबर (santosh.dhaybar@esakal.com) यांच्यासोबत...

लष्करात कर्तव्य बजावत असताना म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदूला पाकिस्तानने पकडल्याचे समजले अन् पायाखालची वाळूच सरकली. काय करावे काय नको समजेनासे झाले. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. टीव्हीवरच्या बातम्यांवरून नातेवाईकांना माहिती समजली. फोन सुरू झाले. काही वेळानंतर चंदूबाबत आजीलाही समजले. आजीला धक्का सहन झाला नाही. हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिने प्राण सोडला. एका बाजूला भावाला पकडले, दुसऱया बाजूला आजीचे निधन झाले. बहिणीची प्रसुती आणि चार महिन्यांची गर्भावती असलेली पत्नी. सर्व बाजूंनी संकटं आली होती. परंतु, धीर एकवटला आणि परिस्थितीला सामोरे जात राहिलो.

पाकच्या ताब्यात असलेला चंदू आणि आजीचे निधनामुळे काय करावं, समजत नव्हतं. परंतु, भावाला सोडवायचंच हा ध्यास घेतला. सतत पाठपुरावा करत होतो. देशपातळीवर अनेकांच्या भेटीगाठी घेत होतो. चंदू नक्की भारतात परतणार, हे प्रत्येकजण सांगत होता. परंतु, जोपर्यंत त्याला पाहात नाही तोपर्यंत काही खरं नव्हतं. नको नको ते विचार मनात येत होते. वेळ द्या, इथेच चंदूला आणणार, असे संरक्षण राज्यमंत्री भामरे साहेबांनी घरात सांगितले होते. त्यांनी ते खरं करून दाखवले. भामरे साहेब आमच्यासाठी देवदूत आहेत. आमच्याकडून त्यांचे उपकार आयुष्यभर फिटू शकणार नाहीत.

चार महिन्यांच्या काळामध्ये अनेकांनी पाठिंबा दिला होता. ठिकठिकाणी धार्मिक विधी सुरू होते. अनेकजण पैशांच्या मदतीसाठीही पुढे येत होते. परंतु, मला केवळ माझा भाऊ सोडून काहीच दिसत नव्हते. चंदू कशाही अवस्थेत आला तरी त्याला आयुष्यभर सांभाळीन पण तो लवकरात लवकर यावा, हेच वाटत होतं.

चंदू पकडला गेल्यानंतर गावामध्ये सुन्न वातावरण होतं. गावामध्ये कोणताही सण साजरा केला जात नव्हता. गावातील प्रत्येक घरात फक्त बातम्यांचेच चॅनेल लावले जात होते. गावातील नागरिक एकतर टीव्हीपुढे नाहीतर देवळात बसलेले दिसायचे. परिसरात ठिकठिकाणी जप सुरू होते. गावकरी धार्मिक विधी करत होते. एका विद्यार्थीनीने तर नवरात्रात चंदूच्या सुटकेसाठी उपवास केले होते. शाळेच्यावतीने प्रार्थना करण्यात येत होती. बोरविहीर गावातील 99 विद्यार्थी व शिक्षक असे सर्वजण मिळून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आले होते. परंतु, काही कारणास्तव भेट होऊ शकली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते.

लष्करात सेवा बजावत असताना अचानक एका व्यक्तीनं जवळ येत 'भाऊ लवकरच परतणार' असं सांगितलं. त्या व्यक्तीनं अचानक सांगितल्यामुळे अंगावर काटा उभा राहिला. त्या व्यक्तीचा शब्द अखेर खरा ठरला आहे. प्रयत्नांती परमेश्वर या भावनेनं शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो; हार मानलीच नाही. सगळ्या बाजूंनी प्रयत्न सुरू होते. यश आलं...देशाची प्रार्थना देवाला ऐकावी लागली.

चंदू अमावस्येला गेला अन् पोर्णिमेला परतला...
पाकिस्तानने चंदूला पकडले तो दिवस अमावस्येचा होता. भारतात परतला तो दिवस पोर्णिमेचा होता. यामुळे आमचा चंदू अमावस्येला गेला अन् पोर्णिमेला परतलला असेच म्हणावे लागेल. चंदू गेला त्याच्या दुसऱया दिवशी बहिणीला मुलगा झाला आणि तो परतला आणि मला मुलगी झाली. मुलीच्या जन्मानं आमच्या घरात पुन्हा आजीने जन्म घेतला आहे, असंच वाटत आहे. गेल्या चार महिन्यांच्या काळात खूप काही सोसले. परंतु, शेवटपर्यंत आजोबा खचले नाही. फक्त... आज आजी पाहिजे होती.

'डॉन'चेही आभार..
चंदू पकडल्याचे वृत्त पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. 'डॉन'ने हे वृत्त प्रसारित केले नसते तर चंदूचा ठावठिकाणाच लागला नसता. शिवाय, भारतातील सर्वच प्रसारमाध्यमांनी शेवटपर्यंत चंदूसाठी मोठी साथ दिली. 'डॉन'बरोबरच या सर्वच प्रसारमाध्यमांचे आम्ही आभार मानतो.

संतोष धायबर

Esakal

Saturday, 17 December 2016

काळ्या पैशाची माहिती थेट सरकारला कळवा

Rupee

नवी दिल्ली : काळा पैसाधारकांची माहिती नागरिक थेट आता सरकारला कळवू शकणार आहेत. नागरिकांनी काळा पैसाधारकांची माहिती ई-मेल आयडी : blackmoneyinfo@incometax.gov.in येथे पाठवावी, असे आवाहन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी शुकवारी केले.

केंद्र सरकारच्या या पावलामुळे काळा पैसाधारकांची माहिती नागरिकांकडून थेट सरकारला मिळून कारवाई करणे सोपे जाणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात रोकड देशभरात जप्त करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग स्थानिक पोलिसांना हाती घेत देशभरात कारवाई करीत आहेत. या कारवाईत नागरिकांना सामावून घेण्यासाठी आणि जास्तीत जास्त काळा पैसाधारकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने जनतेलाच माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

Wednesday, 5 October 2016

लष्कराच्या कारवाईबाबत संशय नको

नवी दिल्ली - भारतीय लष्कराचे सर्जिकल स्ट्राइक बनावट असल्याचा पाकिस्तानचा प्रचार खोडून काढण्यासाठी या कारवाईचे व्हिडिओ पुरावे सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, भारतीय लष्कराने जाहीर केलेली माहिती विश्‍वासार्ह असून, त्यावर संशय घेणे अयोग्य आहे, असा निर्वाळा कॉंग्रेसने दिला आहे. त्याचप्रमाणे, सध्या पाकिस्तानशी चर्चेसाठी योग्य वातावरण नाही, असा सल्लाही सरकारला दिला आहे. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी आज दैनंदिन वार्तालापादरम्यान लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकला जोरदार पाठिंबा दर्शवला. एवढेच नव्हे तर पाकिस्तानने चालविलेला कुप्रचार खोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्र सरकारने त्या देशाला आंतराष्ट्रीय व्यासपीठावर उघडे पाडावे, असे आवाहनही केले. दहशतवादाचा त्रास भारताला होत असताना पाकिस्तानने कारवाई केली नाही म्हणूनच भारतीय लष्कराला करवाई करावी लागली हे सांगावे. अर्थात, ताज्या सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ सरकारने जाहीर करावेत काय, या मागणीवर शर्मा यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आणि "हाती असलेल्या सर्व साधनांचा वापर करून पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड करावा,‘ अशी सावध टिप्पणी केली.

शर्मा म्हणाले, की भारतीय लष्कराने या आधीही 2008, 2009, 2011 आणि 2013 मध्ये केले होते. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक पहिल्यांदाच झाले, असा दावा करणे म्हणजे लष्कराच्या क्षमतेवर शंका घेण्यासारखे आहे. कारवाईचा निर्णय लष्कराचा होता. मात्र, त्याबाबतची जाहीरपणे घोषणा करणे हा राजकीय निर्णय असून विद्यमान सरकारला राजकीय जबाबदारी घ्यावी, असे वाटत असले तर कॉंग्रेसचा त्याला आक्षेप नाही. परंतु, पाकिस्तानला अजूनही जागतिक पातळीवर एकाकी पाडता आलेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उरीतील हल्ल्यानंतर लगेच रशियाने पाकिस्तानसोबत लष्करी सराव केला आणि काल, इराणी नौदलाने पाकिस्तानी नौदलासोबत सराव केला आहे. त्यामुळे भारताला परराष्ट्र धोरणात आणखी आक्रमकता आणावी लागेल, असे ते म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा झाल्याच्या वृत्तावर बोलताना शर्मा यांनी सध्या पाकिस्तानशी चर्चेला अनुकूल वातावरण नाही, अशी टिप्पणी केली. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी कलावंतांनाही त्यांनी विरोध दर्शवला. दहशतवादी आणि कलावंत यांच्यात फरक आहे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिक दहशतवादी नाही; परंतु जनतेमधील थेट संपर्कासाठीही वातावरण अनुकूल नाही, असे ते म्हणाले.

सर्जिकल स्ट्राइकबद्दल विधाने करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिपक्वता आणि संयम दाखविण्याची गरज आहे.
- आनंद शर्मा, प्रवक्ते, कॉंग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क

पाकवर धाकासाठी 'शिवनीती'ची गरज -श्रीनिवास सोहोनी

पुणे - ""पाकव्याप्त काश्‍मीरमधील "सर्जिकल स्ट्राइक‘नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्वक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आण्विक शस्त्रांचा पहिल्यांदा वापर न करण्याच्या धोरणाचा फेरविचार झाला पाहिजे, असे मत मांडताना ""पाकिस्तानला धाक बसविण्यासाठी "शक्ती आणि युक्ती‘बरोबरच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती अवलंबण्याची गरज आहे,‘‘ असे प्रतिपादन प्रशासन व धोरणविषयक तज्ज्ञ श्रीनिवास सोहोनी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

"सकाळ साप्ताहिक‘च्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "भारताची सुरक्षितता ः काही पैलू‘ या विषयावर सोहोनी बोलत होते. या वेळी "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार, समूह संपादक श्रीराम पवार आणि पुणे आवृत्तीचे संपादक मल्हार अरणकल्ले व्यासपीठावर उपस्थित होते.

सोहोनी म्हणाले, ""उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबतच्या धोरणात मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध नमते न घेता आपल्या बाजूने संयम राखून चोख प्रत्युत्तर द्यायचे, असे धोरण भारताने स्वीकारले आहे. त्याचा फायदा निश्‍चितच आपल्याला होईल. पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती या पुढेही सुरू राहतील. दहशतवादी हल्ले वाढतील. बनावट नोटा, अमली पदार्थ भारतात पेरण्याचे प्रमाणही वाढेल. पण, त्याला योग्य वेळी शक्तीने आणि अधिकाधिक युक्तीने प्रत्युत्तर दिले पाहिजे.‘‘

""त्या वेळीही (सतरावे शतक) परकीय राजवटींनी या भूमीत प्रचंड आक्रमणे केली; मात्र त्यांनी त्यांचा निःपात केलाच ना, आपल्या शिवाजीमहाराजांनी. त्यांनी शक्तीबरोबरच युक्तीचा वापर केला आणि सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याचा लढा दिला,‘‘ याची आठवण करून देताना सोहोनी यांनी औरंगजेबच्या साताऱ्यावरील स्वारीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ""सातारचा वेढा सुरू असताना तिकडे किल्ल्यावरून लढत लढत मावळ्यांची एक तुकडी खाली आली आणि त्यांनी औरंगजेबचे अनेक सैनिक ठार केले. अखेरीस त्यांना पकडून औरंगजेबपुढे उभे करण्यात आले तेव्हा त्याला धक्का बसला. कारण त्या लढवय्या सैनिकांमध्ये नऊ मराठे आणि चार मुस्लिम होते. माझ्या मृत्युपश्‍चात आपले काहीही उरणार नाही, असे उद्‌गार औरंगजेबने त्या वेळी काढले. महाराजांनी सर्व जातिधर्मांना आपलेसे केले होते.‘‘

युद्ध कोणाच्याच फायद्याचे नाही, असे सांगताना सोहोनी म्हणाले, ""लष्करी कारवाईमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. या दोन्ही देशांमध्ये शांतता राखता आली तर चांगले; पण गरज पडल्यास लष्करी कारवाई केली पाहिजे. सिंधू पाणी करारातून आपल्याला काही फायदा नसल्याने त्यातील अटी व बंधनांचा फेरविचार होण्याची गरज आहे. त्यातून पाकिस्तानवर कायम दबाव राखता येईल.‘‘

""परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. त्यातून सौदी अरेबियाशी यापूर्वी कधी नव्हते इतके संबंध चांगले झाले आहेत. अमेरिकेशी खूप चांगल्या पद्धतीने संबंध सुधारले आहेत. तसेच, शेजारील नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका यांना दिलेल्या आर्थिक मदतीने यांच्याशी संबंध दृढ होत आहेत. असे चांगले संबंध दीर्घकाळ टिकविण्यासाठी दररोज पराकाष्ठा करावी लागेल,‘‘ असे त्यांनी स्पष्ट केले.

सोहोनी म्हणाले, ""आदर्शवाद, दुसऱ्यावर विश्‍वास ठेवणे हे काही प्रमाणात महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यूहात्मक दृष्टीने हे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हावा. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय नेतृत्वाने भातृभाव स्वीकारला होता. त्यातून लष्कराला सावत्र आईसारखी वागणूक दिली गेली. तोफा, हत्यारे, दळणवळण, रस्ते, रणगाडे, पूल या विषयांचा जनरल थोरात यांचा अहवाल बाजूला ठेवण्यात आला. दुसरीकडे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले रशिया, चीन, अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि युरोप यांना जोडणारे मार्गही बंद झाले. त्याचा फायदा पाकिस्तान आणि चीनला झाला.‘‘
श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सकाळ साप्ताहिकाच्या सहसंपादक ऋता बावडेकर यांनी केले.


भारताने गमावलेल्या संधी
- 1949 काश्‍मीरमधून घुसखोरांना हुसकविले होते; पण "जैसे थे‘चे धोरण स्वीकारले.
- 1962 चीन युद्धात भारताने हवाई दलाचा वापर केला नाही.
- 1965 पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात जिंकलेला हाजीपीर पास ताश्‍कंद करारात परत दिला.
- 1972 या युद्धात पाकिस्तानचे 92 हजार सैनिक ताब्यात असताना जिंकलेला प्रदेश परत केला.
- 1998 गुप्तचर यंत्रणा शिथिल करण्याचा निर्णय

-श्रीनिवास सोहोनी

- - सकाळ वृत्तसेवा

Saturday, 24 September 2016

हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून काढणार मोर्चा - पुणे

पंधरा लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग असणार
पुणे - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. 25) पुण्यात होणाऱ्या "मराठा क्रांती (मूक) मोर्चा‘ची तयारी पूर्ण झाली असून, या मोर्चात 15 लाख नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा मोर्चा नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यादृष्टीने मोर्चाची संपूर्ण रचना करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.


मोर्चाचे नियोजन करणाऱ्या 25 हून अधिक समित्यांनी केलेल्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाच्या प्रारंभी उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर मोर्चाला सुरवात होईल. विधानभवन येथे समारोप होईल. पाच युवतींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करेल. तेथून बाहेर आल्यानंतर सरकारला सादर केलेल्या निवेदनाचे वाचन एक युवती करेल. राष्ट्रगीतानंतर मोर्चाचा समारोप होईल. मोर्चा विसर्जित झाल्याची घोषणा झाल्यानंतर मोर्चातील सहभागी नागरिक आहे त्याच ठिकाणाहून आपापल्या गावी निघतील. मोर्चाला मोठ्या प्रमाणात वाहने येणार असल्याने शहरातील नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहनही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

असा राहणार मोर्चा
* महिला, युवती, वृद्धांचा लक्षणीय सहभाग
* पाच ते सात हजार स्वयंसेवक
* प्रमुख रस्त्यांभोवतीच्या 40 संस्थांच्या मैदानांवर पार्किंग
* मोर्चामागे कचरा उचलण्यासाठी स्वयंसेवकांची पथके
* अल्पोपाहार - पाणी, बिस्किटांची सोय
* 25 ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे

मोर्चाची सुरवात, मार्ग व समारोप
गोपाळ कृष्ण गोखले चौकाजवळील (गुडलक चौक) छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजता मोर्चास सुरवात. खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, सतरंजीवाला चौक, नाना पेठ, क्वार्टर गेट, एमएसईबी चौक, समर्थ पोलिस ठाणे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषदमार्गे विधानभवन. शासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून मोर्चाचा समारोप.

वैद्यकीय सेवा व मदत केंद्र
* प्रत्येक चौकात मदत केंद्र
* डॉक्‍टर्स - 550
* परिचारिका - 200
* रुग्णवाहिका - 40
* स्वयंसेवक - 150

Friday, 23 September 2016

भारताच्या महिला प्रतिनिधीने पाकला सुनावले

संयुक्त राष्ट्रसंघ- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाषण म्हणजे लांबलचक निंदात्मक भाषण होते, अशी थेट टीका करीत भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी मोहिमेतील प्रथम सचिव इनाम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या 71व्या सत्रात चर्चेदरम्यान प्रतिक्रिया देण्याचा अधिकार (राइट टू रिप्लाय) वापरत गंभीर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या भाषणाची दखल सर्व माध्यमांनी घेतली.

दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून पाकिस्तानवर हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणात राजनैतिक औपचारिकता जास्त नव्हती, मात्र ते परिणामकारक ठरले.

‘प्राचीन काळातील शिक्षणाचे महान केंद्र असलेल्या तक्षशीलेची भूमी आता दहशतवाद्यांची शाळा, नंदनवन बनली आहे. दहशतवादी बनू इच्छिणाऱ्यांना आणि प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या जगभरातील तरुणांना पाकिस्तान आकर्षित करते! त्यांच्या विषारी अभ्यासक्रमाची फळे संपूर्ण जगाला भोगावी लागत आहेत.‘

आपले सैन्य लढण्यासाठी तयार: पाक पत्रकार

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमधील एका पत्रकाराने ‘चिंता करू नका आपले सैन्य लढण्यासाठी तयार आहे‘ अशा एका युजर्सच्या ट्‌विटला रिट्‌विट केले आहे.


पाकिस्तानमधील “जिओ टिव्ही”चा पत्रकार हमीद मिर याने याबाबतचे ट्‌विट केले आहे. ट्‌विटमध्ये सुरुवातीला त्याने इस्लामाबादमध्ये एफ-16 विमाने घिरट्या घालत असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यानंतर चिंता व्यक्त करण्यात आल्याचे पाहत मिरने एका युजरचे ट्‌विट रिट्‌विट करत याबाबतचा खुलासा केला आहे. रिट्‌विट केलेल्या ट्‌विटमध्ये "चिंता करू नका. आपले सैन्य सजग आणि लढण्यासाठी तयार असल्याची ही केवळ खात्री आहे.‘ असा मजकूर लिहिलेला आहे. याशिवाय मिरने रशियन सैन्य 24 सप्टेंबर पासून 10 ऑक्‍टोबरदरम्यान पाकिस्तानमध्ये युद्ध सरावासाठी आल्याची माहिती आणि छायाचित्रेही रिट्विट केले आहेत.


मिरच्या ट्विटमुळे पाकिस्तान हवाई संरक्षणाचा आढावा घेण्यात येत असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतेही खात्रीशीर वृत्त नाही. तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतात असलेल्या पाकिस्तानमधील कलाकारांना पुढील 48 तासांत देश सोडण्यास सांगितले आहे.

Saturday, 13 August 2016

पाकिस्तानबाबत आता 'धटासी धट...'

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील ताज्या संघर्षाला चिथावणी देणाऱ्या पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि व्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांची दैन्यावस्था, त्यांच्यावरील पाकिस्तानचे अत्याचार व तेथील हिंसाचार आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या चव्हाट्यावर मांडण्याचे "धटासी असावे धट...‘ असे आक्रमक धोरण आखण्याचे भारताने ठरविले आहे. संसदेत काश्‍मीर मुद्द्यावर आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "काश्‍मीरचा तर सवालच नाही; पण पाकिस्तानने बळकावलेले काश्‍मीर (पीओके) हाही भारताचाच अविभाज्य भाग आहे,‘ असे ठणकावून हा विषय प्रथमच ऐरणीवर आणला.

काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविण्याची विरोधकांची मागणी सरकारने तातडीने मान्य केली नाही. मात्र, "काश्‍मीरमधील सर्व संबंधित गटांशी केंद्र चर्चा करेल,‘ असा दिलासाही दिला. खोऱ्यातील परिस्थिती निवळल्यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी बोलून सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरवता येईल, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. काश्‍मिरातील सामान्य जनजीवन पूर्वपदावर येत असून, शिक्षणसंस्था, बाजारपेठा, पर्यटनादी उद्योग हळूहळू सुरू होत आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. देशाच्या अखंडतेबाबत सर्वच पक्षनेत्यांनी "वयं पंचाधिकं शतम्‌,‘ अशा एका सुरात भावना मांडल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये गेले 34 दिवस जारी असलेली संचारबंदी, 60 हून जास्त जणांचे मृत्यू व किमान पाच हजार सुरक्षारक्षक व नागरिक जखमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेत झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत विरोधी पक्षांनी केलेली सर्वपक्षीय बैठकीची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यानुसार संसदीय ग्रंथालय भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी साडेबारा ते साडेतीन अशी तब्बल तीन तास बैठक झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, तसेच राजनाथसिंह, जेटली, सुषमा स्वराज, जितेंद्रसिंह, हंसराज अहिर हे मंत्री उपस्थित होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुलायमसिंह यादव, "पीडीपी‘चे नेते मुझफ्फर बेग व रसूल मीर, सीताराम येचुरी, भर्तुहरी महाताब, नवनीत कृष्णन, शरद यादव, रामदास आठवले, संजय राऊत व चंद्रकांत खैरे आदी नेतेही उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष बैठकीला गैरहजर होता. त्याबद्दल सरकारी गोटातून, डॉ. फारुख अब्दुल्ला प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले.

या बैठकीत काश्‍मिरी नागरिकांना आश्‍वस्त करणे व भारत त्यांच्या भल्याची काळजी करतो, याची खात्री त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्‍यक असल्याचा सल्ला डॉ. मनमोहनसिंग यांनी दिला. काश्‍मीरमधील सर्व राजकीय प्रवाहांशी चर्चा करण्याचा आग्रह आपण धरल्याचे बेग यांनी नमूद केले. काश्‍मिरी निदर्शकांवर पॅलेट गनचा मारा त्वरित थांबवावा, अनावश्‍यक तेथून लष्कराला माघारी बोलवावे, सर्व पक्षांशी चर्चा करताना फुटीरतावाद्यांना वगळू नये, अशा सूचना डाव्या पक्षांनी केल्या. काश्‍मीरमधील हिंसाचाराला व चिथावणीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्याने भारतानेही व्याप्त काश्‍मीरमध्ये तसेच धोरण आखावे, असे आठवले यांनी सांगितले.

राजनाथसिंह व जेटली यांनी अधिकृत निवेदन करताना सांगितले, की काश्‍मीरमध्ये शांततेची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्व पक्षांनी केलेल्या विधायक सूचनांची अंमलबजावणी सरकार करेल या वचनबद्धतेचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. काश्‍मीर मुद्द्याचे समाधान घटनात्मक चौकटीत करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. प्रत्येक काश्‍मिरी नागरिक भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत व शांततामय जीवन जगू इच्छितो, असे सांगताना मोदींनी शेजारी देशाच्या चिथावणीचा उल्लेख केला. सामान्य काश्‍मिरी नागरिकांचे संचारबंदीमुळे होणारे हाल व त्यांच्या वेदनांकडे केंद्र सहानुभूतीने पाहते व त्यासाठी जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस आदींचा वेळोवेळी पुरवठा केला जात आहे. पॅलेट गनचा कमीतकमी मारा करण्याच्या सूचना लष्कराला दिल्या आहेत. मात्र याबाबत तज्ज्ञांची समिती चौकशी करत आहे व तिचा अहवाल आल्यावरच त्यांच्या वापराबद्दल निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. काश्‍मीरमध्ये 2010 पासूनच पॅलेट गनचा वापर सुरू आहे, याकडे जेटली यांनी सूचकपणे लक्ष वेधले. मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील हॉटलाइन संवादावर जेटलींनी, पाकिस्तानच्या कागाळ्यांबद्दल याआधीचे सारेच पंतप्रधान त्या देशाला वेळोवेळी जाहीर समज देत आले आहेत. त्यासाठी हॉटलाइनच हवी असे नाही, अशी कोपरखळी मारली.

पंतप्रधान बैठकीत म्हणाले...

- काश्‍मीरमध्ये अलीकडे घडलेल्या घटना व हिंसाचारामुळे अन्य देशवासीयांप्रमाणेच मीदेखील दुःखी आहे.

- राजकीय मतभेद असले, तरी देशाची एकता व अखंडतेसाठी आम्ही सारे एकजूट दाखवतो, हे या बैठकीत पुन्हा दिसले.

- जम्मू-काश्‍मीर, लडाख याबरोबरच व्याप्त काश्‍मीर हाही भारताचाच अविभाज्य भाग.

- पाकिस्तानमधील सर्व संबंधित गटांशी चर्चा करणार; पण देशाच्या सुरक्षेशी व अखंडतेशी तडजोड नाही.

- काश्‍मिरातील अशांततेची पाळेमुळे सीमेपलीकडील दहशतवादात आहेत. शेजारी देशाकडून काश्‍मिरातील दहशतवादी गटांना बळ व रसद मिळते.

- पाकिस्तान हे विसरतो, की तो स्वतःच्याच देशवासीयांवर लढाऊ विमानांद्वारे बॉंबचा वर्षाव करतो. पाकिस्तानला आता बलुचिस्तान व व्याप्त काश्‍मिरातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे उत्तर साऱ्या जगाला द्यावे लागेल, ती वेळ आता आली आहे.

- जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी व शांततामय तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. त्यासाठी केंद्र सरकार अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेल्या मार्गावरून जात आहे.

-- सकाळ न्यूज नेटवर्क

Saturday, 9 July 2016

लष्करात किमान बळाचेच तत्त्व

निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे मत; अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेण्याची मागणी
पणजी - नागरी सरकारांना बंडखोरी अथवा अन्य कारवायांमध्ये मदत करताना लष्कराला किमान बळाच्या तत्त्वाचे पालन करावे लागते, असे मत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला असून, यावर लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत दीड हजारपेक्षा अधिक बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर त्या भागात लष्करी विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू असेल तरी करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यावर बोलताना निवृत्त लष्करप्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु, याच वेळी संरक्षण दलांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींपैकी किती खऱ्या आहेत, याची चौकशी करायला हवी. लष्कराला लपवून ठेवण्यासारखे काही नाही. एखादी तक्रार स्वीकारल्यानंतर लगेच त्यावर कारवाई होते; मात्र खोट्या तक्रारींवर कारवाई करण्यात येत नाही.‘‘
निवृत्त लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी म्हणाले, ‘बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लष्करावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही. लष्कर कमीतकमी बळाचा वापर करते. आधीपासून अमलात असलेले नियमच सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहेत. नागरी सरकारांना मदत करण्याचे काम लष्कर करते. यासाठी किमान पुरेसे बळ वापरते. याचा अर्थ असा होतो, की समोरच्याला त्याच्याच शस्त्राने लष्कर उत्तर देते.‘‘
लष्करी कारवाई विभागाचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर म्हणाले, ‘कोणत्याही नियमांचे पालन न करणाऱ्या शत्रूला रोखताना लष्कराला या निर्णयाचा फटका बसेल. न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो; मात्र न्यायाधीश वास्तवापासून दूर आहेत. बाहेर एक छोटे युद्ध सुरू आहे. शत्रू कोणतेही नियम न पाळता निर्दयपणे कत्तल करीत आहे. त्यांचा सामना करताना लष्करावर असे निर्बंध आणल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल. पंजाब आणि काश्‍मीरमध्ये याचे प्रतिकूल परिणाम दिसून आले आहेत.‘‘
निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन म्हणाले, ‘लष्कर अस्थिर भागात दाखल असल्यामुळे अफस्पा तेथे लागू आहे. हा कायदा तेथून मागे घ्यायचा असल्यास लष्करालाही त्या अस्थिर भागातून बाहेर काढावे लागेल.‘‘
खोट्या तक्रारी करून लष्कराचे नाव खराब करणाऱ्या घटकांची चौकशी करण्याची गरज आहे.
- एस. एफ. रॉड्रिग्ज, माजी लष्करप्रमुख
दहशतवाद्याने मशिनगन वापरल्यास लष्कर रणगाडे अथवा हवाई हल्ल्याने उत्तर देत नाही.
- शंकर रॉय चौधरी, माजी लष्करप्रमुख
न्यायालयाच्या या निर्णयाचा संरक्षण दलांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
- डी. बी. शेकटकर, अतिरिक्त महासंचालक, लष्करी कारवाई
लष्कराला दहशतवाद्यांशी लढताना कायदेशीर बाबींनाही सामोरे जावे लागत आहे.
- शिशिर महाजन, माजी विभागप्रमुख

 

- शाश्‍वत गुप्ता राय - सकाळ न्यूज नेटवर्क