Saturday, 24 September 2016

हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून काढणार मोर्चा - पुणे

पंधरा लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग असणार
पुणे - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. 25) पुण्यात होणाऱ्या "मराठा क्रांती (मूक) मोर्चा‘ची तयारी पूर्ण झाली असून, या मोर्चात 15 लाख नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा मोर्चा नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यादृष्टीने मोर्चाची संपूर्ण रचना करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.


मोर्चाचे नियोजन करणाऱ्या 25 हून अधिक समित्यांनी केलेल्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाच्या प्रारंभी उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर मोर्चाला सुरवात होईल. विधानभवन येथे समारोप होईल. पाच युवतींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करेल. तेथून बाहेर आल्यानंतर सरकारला सादर केलेल्या निवेदनाचे वाचन एक युवती करेल. राष्ट्रगीतानंतर मोर्चाचा समारोप होईल. मोर्चा विसर्जित झाल्याची घोषणा झाल्यानंतर मोर्चातील सहभागी नागरिक आहे त्याच ठिकाणाहून आपापल्या गावी निघतील. मोर्चाला मोठ्या प्रमाणात वाहने येणार असल्याने शहरातील नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहनही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

असा राहणार मोर्चा
* महिला, युवती, वृद्धांचा लक्षणीय सहभाग
* पाच ते सात हजार स्वयंसेवक
* प्रमुख रस्त्यांभोवतीच्या 40 संस्थांच्या मैदानांवर पार्किंग
* मोर्चामागे कचरा उचलण्यासाठी स्वयंसेवकांची पथके
* अल्पोपाहार - पाणी, बिस्किटांची सोय
* 25 ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे

मोर्चाची सुरवात, मार्ग व समारोप
गोपाळ कृष्ण गोखले चौकाजवळील (गुडलक चौक) छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजता मोर्चास सुरवात. खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, सतरंजीवाला चौक, नाना पेठ, क्वार्टर गेट, एमएसईबी चौक, समर्थ पोलिस ठाणे, लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषदमार्गे विधानभवन. शासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून मोर्चाचा समारोप.

वैद्यकीय सेवा व मदत केंद्र
* प्रत्येक चौकात मदत केंद्र
* डॉक्‍टर्स - 550
* परिचारिका - 200
* रुग्णवाहिका - 40
* स्वयंसेवक - 150

No comments:

Post a Comment