Monday, 26 September 2016

लष्कर बोलत नाही, थेट पराक्रम करते!

नवी दिल्ली - उरीतील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर मौनात गेलेल्या केंद्र सरकारचे प्रमुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे केरळातील सभेपाठोपाठ "आकाशवाणी” वरील “मन की बात” मधून उरी हल्ल्याचा उच्चार करत हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना माफ करणार नाही, असे सांगितले. “लष्कर बोलत नाही, थेट पराक्रम करते”, असा अत्यंत सूचक इशारा मोदी यांनी शत्रूराष्ट्राला दिला.


“मन की बात” ला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त “आकाशवाणी” ला पंतप्रधानांनी धन्यवाद दिले. मोदी यांनी काल कोझीकोडच्या जाहीर सभेत उरीतील 18 हुतात्मा जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्‍वास देशवासीयांना दिला होता. सत्तेवर येण्यापूर्वीचे मोदी यांची भाषा उरीतील हल्ल्यानंतर एकदम बदलून मवाळ झाल्याने शोकसंतप्त देशवासीयांमध्ये सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जनतेचा आक्रोश “पीएमओ” पर्यंत पोचल्यानेच मोदींना उरी हल्ल्याचा सलग दोनदा जाहीर उच्चार करणे भाग पडल्याचे मानले जाते.


मोदींनी आजच्या कार्यक्रमाची सुरवातच उरी हल्ल्यातील 18 हुतात्म्यांना आदरांजली वाहून केली. या हल्ल्याबाबत पंतप्रधानांनी एकदा किमान तोंड तरी उघडावे, अशा प्रकारच्या सूचनांचा पाऊस "नरेंद्र मोदी व माय जीओव्ही ऍप‘वर पडला होता. त्या अनुषंगाने मोदी म्हणाले,  “आपली सेना शूर आहे व भारतात घुसखोरी करण्याचा प्रत्येक प्रयत्न ती हाणून पाडेल. राजकारण्यांना बोलण्याच्या अनेक संधी मिळतात; पण लष्कर बोलत नाही, तर फक्त पराक्रम करते.”

 
काश्‍मीरमधील अशांततेबाबत बोलताना सत्यपरिस्थिती काश्‍मिरी लोकांसमोर आल्याने त्या लोकांनाही शांतता हवी आहे, असा दावा केला. उरीतील हल्ल्यानंतर हर्षवर्धन या 11वीच्या विद्यार्थ्याने पाठवलेल्या पत्राचा उल्लेख मोदींनी केला. महात्मा गांधी स्वच्छता मोहिमेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त मोदींनी या मोहिमेची सुरवात चांगली झाल्याचे प्रशस्तीपत्र स्वतःच्या सरकारला दिले. दिल्लीतील रेस कोर्स रोडचे बारसे लोककल्याण मार्ग असे नुकतेच करण्यात आले. या नामबदलाचे ठाम समर्थन करताना पंतप्रधानांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव या नामबदलाशी जोडले.
अपंग खेळाडूंचे कौतुक

रियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत अपंग खेळाडूंनी केलेल्या भरीव कामगिरीची मोदींनी भरभरून स्तुती केली. अपंगत्वालाही पराभूत करणाऱ्या नगरच्या दीपा मलिक, एका तपानंतर दुसऱ्यांदा ऑलिंपिक सुवर्णपदक पटकावून वयावर मात करणारे देवेंद्र जांझरिया, 21 वर्षांचा एम. थंगवेलू या सुवर्णपदक विजेत्यांचे त्यांनी मुक्तपणे कौतुक केले.

-सकाळ न्यूज नेटवर्क

No comments:

Post a Comment