पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. उरी हल्ल्यानंतर तडकाफडकी प्रतिक्रिया न देता भारताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा केलेला अवलंब प्रभावी आहे. या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायला हवे.
या परिस्थितीत थेट युद्धासाठी आव्हान देणे योग्य ठरणार नाही. मात्र, या कारवाईमुळे देशवासीयांमधील संतापाला वाट मिळेल. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत राजनैतिक धोरण परिणामकारक ठरत असताना ताबडतोब आव्हान न देता, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही युद्धनीती उपयुक्त ठरेल. त्यामुळे या हल्ल्याबद्दल भारताला दोष देऊ शकणार नाहीत. अन्यथा घाईत दिलेली प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्व कारवाई वाटली असती. मागील काही वर्षांमधील प्रगतीमुळे भारताचे स्थान उंचावलेले आहे. त्याला साजेशी अशी कारवाई करण्यासाठी मोदींनी शिवाजी महारांजांची नीती वापरली आहे.
अशा हल्ल्यात कमीत कमी वेळात शत्रूचे जास्त नुकसान केले जाते. शस्त्रांचे आगार (कोट) व दारूगोळा साठविण्याची ठिकाणे उडविली जातात.
थेट युद्धाने देश 50 वर्षे मागे जाईल!
सर्जिकल स्ट्राइक अतिशय योग्य असून, त्यामुळे आपली हानी कमी होते. या उलट थेट युद्ध केल्यास ते पाच दिवस जरी झाले तर भयंकर खर्च होतो. तसे युद्ध केल्यास अर्थव्यवस्थेवर ताण येऊन पेट्रोल होईल 200 रुपये लिटर, आणि दूध होईल 100 रुपये प्रतिलिटर. युद्धामध्ये अमाप दारूगोळा वापरावा लागतो. एका तोफगोळ्यासाठी दोन हजार ते लाखो रुपयांपर्यंत खर्च होतो. 100 मीटर ते काही किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणारे हे गोळे असतात. काही वेळातच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, आणि युद्ध करणारा देश 50 वर्षांनी मागे जाईल.
दोन्ही देशांमध्ये 80 टक्के जनता ही कमी उत्पन्न असणारी आहे. युद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धांमुळे अधिकाधिक खर्च होत राहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो. क्युबा देशामध्ये 20 टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. आपल्याकडे हे प्रमाण दीड टक्का एवढे कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्ध करताना रयतेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी नेहमी घेतली. रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची त्यांचे धोरण होते.
आत्मघातकी हल्ल्यांपेक्षाही प्रभावी...
दोन पाकिस्तानी दहशतवादी येऊन हल्ला करतात, आणि आपला देश हालवून टाकतात. आपणही तसे हल्ले पाकच्या हद्दीत घडवून आणू शकतो, परंतु आपल्याला लौकिकाला ते साजेसे ठरणार नाही. हानी टाळण्यासाठी ही सर्जिकल पद्धत योग्य ठरते.
शत्रूची ठाणी आणि दारुगोळा उद्ध्वस्त करणे हे परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. अशा हल्ल्यांमध्ये नुकसान करून परत येऊ शकतो. हल्ला केलेल्या ठिकाणाजवळ छोटी गावे असतात, तिथे राहून हल्ला घडविण्याचे एक तंत्र आहे, मात्र भारतीय सैन्याची तिथे ताबडतोब ओळख पटू शकते, त्यामुळे ते तंत्र धोकादायक आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी मात्र काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मदतीने असे हल्ले घडवून आणतात.
दहशतवाद्यांनी वापरले अत्याधुनिक तंत्र...
उरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक फॉस्फरस ग्रेनेडचा वापर केला. हा हल्ला अतिशय नियोजनपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. हे ग्रेनेड टाकल्यावर त्याचे तुकडे उडतात, त्यातून फॉस्फरस गॅस बाहेर उडतो. त्याचा धूर होतो, शरीरावर किंवा कापडावर ते उडताच आगीचा भडका होतो. उरी हल्ल्यात जवान आगीमध्ये होरपळून हुतात्मा झाले, त्यावरून तिथे असेच फॉस्फरस ग्रेनेड वापरल्याचे दिसते.
भारतीय सैन्याचेही नुकसान शक्य...
या हल्ल्यात आपल्या बाजूला किती हानी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय सैन्याचेही काही नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सीमेलगतच्या भागात भूमिगत सुरुंग (लँडमाइन) पेरलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी जाताना व्यक्तीसोबत, जीपसारखी वाहने आणि रणगाडेसुद्धा उद्धवस्त करण्याची क्षमता असते. तसेच, पाककडून गोळीबारामुळेही हानी झालेली असेल.
खरंच युद्ध करायचं का?
युद्ध करा हे बोलणे खूप सोपे आहे. परंतु, सीमेवर लढताना आम्ही स्वतः मृत्यू जवळून पाहिला आहे. ज्याचा मुलगा युद्धात गेला आहे त्या आईला विचारा युद्ध हवंय का? जिचा नवरा युद्धात हुतात्मा झालाय त्या पत्नीला विचारा युद्ध हवे आहे का? हुतात्मा कर्नल महाडिक यांच्या घरी मी गेलो होतो, तेव्हा पत्नी गाईसारखा हंबरडा फोडत होती. ते पाहवत नव्हते.
- कर्नल सुरेश पाटील
No comments:
Post a Comment