युद्धाचे कथानक अथवा कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी उत्सुकता जगभर सर्वत्र आढळते. युद्धाचे अनुभव रम्य असतात, तसेच तितकेच भयानकही असतात. माझे अनुभव मी काही माझा अहंकार म्हणून सांगत नाही, तर ते माझे अलंकार म्हणून सांगत आहे. अलंकार अशा अर्थाने, की माझ्या उभ्या आयुष्यात देशासाठी केलेली ती छोटीशी पण प्रामाणिक सेवा आहे.
भारतीय सेनेमध्ये माझा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून 1969 ला राजौरी येथे 14 ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये रुजू झालो. सैनिकी जीवनामधील प्रामुख्याने तीन लहान-मोठ्या घटना माझ्या मनावर कधीही न विसरण्यासाठी कोरल्या गेल्या आहेत.
पहिली घटना म्हणजे माझ्या कमांडिंग ऑफिसरने केलेला उपदेश. ‘माणसांच्या जीवनामध्ये काहीना काही महत्त्वाकांक्षा, लक्ष्य, उद्दिष्टे असावीत.‘ ज्या वेळी माझे प्रशिक्षण सुरू होते, त्या वेळी आमच्या कमांडिंग ऑफिसरनी वरील आशयाचा कानमंत्र आम्हाला दिला. तो कानमंत्र असा की, प्रत्येक सैनिकाने उराशी दोन महत्त्वाकांक्षा बाळगाव्यात. एक म्हणजे प्रत्येक सैनिकाने ‘जनरल‘ व्हावयाचे व दुसरी महत्त्वाकांक्षा म्हणजे प्रत्येक सैनिकाने आपल्या सैनिकी जीवनामध्ये एकदा तरी युद्धाला सामोरे जायचे. अर्थात, प्रत्येक सैनिक काही ‘जनरल‘ होऊ शकणार नाही; परंतु केव्हा ना केव्हा आपल्या देशासाठी त्याला युद्धाचा अनुभव घेता येतो आणि मीसुद्धा माझ्या सैनिकी जीवनामध्ये युद्धाचा अनुभव घेतलेला आहे व माझी दोन्हीपैकी एक महत्त्वाकांक्षा पुरी केली आहे.
दुसरी घटना 1971 मध्ये भारत-पाक युद्धाला तोंड फुटले तेव्हाची. 14 जून 1971 रोजी बंगालमधील ‘तुरा‘ या ठिकाणी युद्ध आघाडीवरील ‘मुक्ती वाहिनी‘ नामक सैनिकी तुकडीमध्ये माझी पी.ओ.डब्ल्यू. (प्रिझनर ऑफ वॉर) कॅम्प ऑफिसर इन्चार्ज म्हणून जबाबदारीच्या पदावर बदली करण्यात आली. त्या वेळी युद्धात बरेच पाकिस्तानी युद्धकैदी मिळाले होते. त्यापैकी माझा पहिला युद्धकैदी होता पाकिस्तानी ब्रिगेडिअर! त्याला घेऊन मला कोलकत्याला जावे लागले. त्या विमानप्रवासात त्याच्याशी बरीच चर्चा करता आली व महत्त्वाची माहितीही घेता आली. पुढे ते विमान गुवाहाटी विमानतळावर उतरले. पुढील बदली विमान मिळण्यासाठी आम्हाला आठ तास अवकाश होता. या आठ तासांत तो नजरकैदी म्हणून त्याच्यावर मला बारकाईने लक्ष ठेवावे लागले होते. याच आठ तासांत त्याने आपल्या बऱ्याच आठवणी मला कथन केल्या. पाकिस्तान व भारतीय सैन्यात तसा काही बराचसा फरक नाही व त्या ब्रिगेडिअरचा मी आमच्या ब्रिगेडिअरसारखा सन्मान व आदर केला. त्याच्या मनात सर्व भारतीयांबद्दल खरेच प्रेम राहील असेच वागलो आणि त्याने तसे म्हणून दाखविले. अर्थात तो युद्धकैदी! आणि म्हणून त्याच्याशी केलेली चर्चा व त्याने माझ्याशी केलेली चर्चा हा प्रसंग तसा दुर्मिळच म्हणावा लागेल.
माझ्या मनावर कोरली गेलेली तिसरी घटना 1971 च्या युद्धाची. अर्थात माझ्या पुनर्जन्माचीच! परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या भयानक तांडव नृत्यातून बाजूला खेचले होते. त्याचे असे झाले - ‘14 ग्रेनेडियर रेजिमेंट‘ येथील 6 अधिकारी युद्धात मारले गेले. फारच भयानक घटना घडली होती ती. माझी तातडीने ‘तुरा‘हून राजौरी येथे बदली करण्यात आली. मला हे एक आव्हानच होते. कारण, माझी नेमणूक सैनिकी मोर्चावर झाली होती. आम्ही जी शस्त्रे, अस्त्रे वापरत होतो, तशाच प्रकारचा शस्त्रांचा व अस्त्रांचा वापर शत्रू पक्षाकडून होत होता. आपल्यासारखाच उखळी तोफांचा वापर शत्रू पक्षाकडून सर्रास होत होता. रात्र वर चढत होती. सर्वत्र काळोख दाटला होता. रात्री अकराच्या सुमारास आमचा होरा चुकला व आम्ही शत्रूच्या उखळी तोफेचे लक्ष्य बनलो. शत्रूच्या उखळी तोफेतून सुटलेला एक गोळा अचानक माझ्यासमोर एक मीटर अंतरावर येऊन आदळला. मला काही समजायच्या आतच त्याचा महाभयंकर असा स्फोट झाला. त्याच्या ठिकऱ्या, त्याचे कण माझ्या शरीरात सर्वत्र घुसले. एक तुकडा छातीमध्ये. माझ्याबरोबर पाठीवर वायरलेस सेट घेतलेला साथीदार जवान फार मोठ्या प्रमाणावर जखमी झाला.
आम्ही जखमी होऊन बेशुद्धावस्थेत कोसळलो. शुद्धीवर होतो त्या क्षणापर्यंत मातृभूमीचे व परमेश्वराचे चिंतन मनामध्ये करीत होतो. पहाटे-पहाटेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेशुद्धावस्थेतच आम्हाला मेडिकल पॉइंटला हलविले. काही तासांच्या उपचारानंतर आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शत्रूने वापरलेल्या बॉंबगोळ्यांची माहिती मला दिली. 81 मिलिमीटर मॉर्टर (उखळी तोफ) मधून सोडण्यात आलेला बॉंब इतका प्रभावी असतो, की त्याच्या स्फोट झालेल्या ठिकाणापासून 9 मीटर परिघातील अंतरावरील काहीही शिल्लक अथवा जिवंत राहत नाही; पण मी? मी वाचलो. माझा साथीदारही वाचला. कारण, त्याच्या पाठीवरील वायरलेस सेटने चिलखताची भूमिका बजावली होती; पण मी वाचलो केवळ परमेश्वराची कृपा व पुढे माझ्या हातून यापेक्षाही चांगली देशसेवा घडावी म्हणून असेच माझ्या मनाला वाटते.
मला माझ्या कामगिरीबद्दल ‘पर्पल हार्ट मेडल‘ मिळाले व महाराष्ट्र सरकारने या कारवाईबद्दल गौरव व मानधन देऊन सत्कार केला. सैन्यातील सेवा 10 वर्षांची होणे व युद्धातील पराक्रमाचा एक दिवस सममूल्याचा मानला जातो. म्हणून मला नेहमी शहीद भगतसिंगांच्या मातोश्रींचे उद्गार आठवतात, ‘देशासाठी एक वेळ मरणे म्हणजे शंभर वेळा जन्म घेण्यासारखे आहे.‘
- कर्नल सुरेश डी. पाटील
No comments:
Post a Comment