‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत किमान ३५ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.
पाकिस्ताव्याप्त काश्मीरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला हा इशारा मानला जातो. काल (ता. २८) मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास समाप्त झाली. नियंत्रणरेषा ओलांडून भारताने प्रथमच अशी कारवाई केली आहे. या कारवाईत हवाई दलाचेही सहकार्य होते. उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी जोरात होती. ‘उरीच्या हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल आणि १८ जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, तसेच हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ लष्कर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लष्कराच्या विशेष जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. उरीतील हल्ल्यानंतर व्याप्त काश्मीर व नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भागात एक आठवड्यापासून लक्ष केंद्रित करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर कुपवाडा आणि पूंचजवळच्या नियंत्रणरेषेजवळील पाच-सहा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.
अर्थात लष्कराने कारवाईचा तपशील देण्याचे टाळले असले, तरी यात दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय प्रमाणात हानी झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ही मोहीम सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
लष्कराने काल मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे यावर लक्ष ठेवून होते, असे कळते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही सरकारतर्फे याबाबत माहिती देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची औपचारिकरीत्या घोषणा करण्यात आली. लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी हद्दीमध्ये असलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून, त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले. अर्थात ही पत्रकार परिषद निवेदनापुरतीच मर्यादित राहिली.
लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी प्रारंभी उरी आणि पूंछमधील हल्ल्यांची पार्श्वभूमी विशद केली. नियंत्रण रेषेजवळील तळांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा आणि जम्मू-काश्मीर व देशातील महानगरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, अशी विश्वसनीय आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या तळांवर लक्ष्याधारीत हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) केले. या संभाव्य घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांची जीवितहानी होऊ नये या उद्देशानेच लष्कराने ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.
या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती पाकिस्तानी ‘डीजीएमओ’ यांना देण्यात आल्याचे सांगताना लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग म्हणाले, की शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे राहून कारवाया कराव्यात आणि आपल्या नागरिकांवर हल्ले करत राहावे हे खपवून घेतले जाणार नाही. दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवायांसाठी आपल्या भूप्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही, या २००४ मध्ये पाकिस्तानने दिलेल्या ग्वाहीची त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली.
उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. यामध्ये लष्कराच्या तुकड्या आणि हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचे समजते.
पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही; परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे.
- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, महासंचालक, लष्करी कारवाई
सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?
नियोजनबद्ध आणि नेमकेपणाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हटले जाते. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते, त्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोचणार नाही, याची काळजी यामध्ये घेतली जाते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणाऱ्या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बाँबहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बाँबहल्ला करण्याच्या हे अगदी विरुद्ध आहे.
अशी झाली कारवाई...
विशेष कृती दलाने बुधवारी (ता. २८) रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन किलोमीटर आतपर्यंत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर ही कारवाई केली.
जवानांना उतरविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत
व्याप्त काश्मीरमधील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्टरमध्ये ही कारवाई झाली.
किमान १५० जवानांना या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले.
पर्रीकर, दोवाल यांचे कारवाईवर लक्ष
अत्यंत नियोजनबद्ध चाल करत जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट केले.
भारताची हानी नाही; मात्र किमान ३८ दहशतवादी ठार.
कारवाईनंतर...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन मोदींनी दिली लष्करी कारवाईची माहिती.
उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनाही दिली माहिती.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही याविषयी सांगितले.
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोनिया गांधींसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना या कारवाईबाबत माहिती दिली.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लष्करी कारवाईबाबत कळविले.
राजनाथसिंह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.
पाककडून हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन पंजाब, राजस्थानमधील सीमेला लागून असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर.
जम्मू आणि काश्मीरमध्येही याच पद्धतीची दक्षता.
हल्ला झाल्याचा पाकिस्तानकडून इन्कार; नऊ सैनिक ठार झाल्याचा दावा
संकेत धुडकावून भारताने आक्रमण केल्याचा नवाझ शरीफ यांचा कांगावा
पुढच्या वेळी आम्ही उत्तर देऊ - ख्वाजा असिफ यांची धमकी
- - सकाळ न्यूज नेटवर्क
No comments:
Post a Comment