Thursday, 29 September 2016

लष्करी कारवाई महासंचालकांचे निवेदन

नवी दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून दहशतवाद्यांची घुसखोरी ही अत्यंत गंभीर बाब आहे. येत्या 11 आणि 18 सप्टेंबरला झालेल्या पूँछ आणि उरी दहशतवादी हल्ल्यात याचे प्रतिबिंब उमटले आहे. यावर्षी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किंवा जवळ असे 20 घुसखोरीचे प्रयत्न लष्कराने हाणून पाडले.

या दहशतवादी हल्ल्यात आणि घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये त्याचे मूळ पाकिस्तान असल्याचे सूचित करणाऱ्या जीपीएससहित अनेक बाबी आम्हाला सापडल्या आहेत. याखेरीज पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमधल्या पकडण्यात आलेल्या अनेक दहशतवाद्यांनी त्यांना प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानातून किंवा पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशातून मिळाल्याची कबुली दिली आहे. लष्कराच्या माध्यमातून उच्चस्तरीय राजनैनिक पातळीवर ही बाब मांडण्यात आली आहे.

आपल्या भूमीचा किंवा नियंत्रणाखालील क्षेत्राचा वापर भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी न होऊ देण्याच्या जानेवारी 2004 च्या कराराचे पाकिस्तानने पालन करावे, असे आवाहन वारंवार करूनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या आहेत. यामुळे आपले नुकसान जर मर्यादित राहिले असेल तर ते आपल्या सैनिकांच्या अविरत प्रयत्नांमुळे. घुसखोरीरोधक बहुस्तरीय पध्दतीमुळे घुसखोरीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

घुसखोरी करून जम्मू-काश्मीर आणि इतर महानगरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ काही दहशतवादी तुकड्या तळ उभारुन सज्ज असल्याची खात्रीची गुप्तवार्ता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने या तळांवर नेमके नियंत्रित हल्ले केले. विघातक कृत्यांमध्ये दहशतवादी यशस्वी होऊ नयेत हे उद्दिष्ट ठेवून ही कारवाई करण्यात आली.

या दहशतवादविरोधी कारवाई अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा डाव निष्फळ केल्यानंतर कारवाई आता थांबवण्यात आली आहे. ती पुढे सुरू ठेवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र कुठल्याही संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या लष्करी कारवाई महासंचालकांच्या संपर्कात मी असून आपल्या कारवाईची माहिती त्यांना दिली आहे. क्षेत्रात शांती आणि सलोखा ठेवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. मात्र दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कार्यरत राहून आपल्या इच्छेप्रमाणे घुसखोरी करून आमच्या देशातील नागरिकांवर हल्ला करणे आम्ही सहन करणार नाही. क्षेत्रातून दहशतवाचा समूळ नायनाट करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आम्हाला सहकार्य करेल, अशी अपेक्षा आम्ही करतो.
 
PIB Release/DL/1518

No comments:

Post a Comment