Sunday, 18 September 2016

उरीतील हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच- सुभाष भामरे

नाशिक - जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवार) सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्लात 17 जवान हुतात्मा झाले असून, 8 जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या हल्ल्यानंतर भामरे नाशिक दौरा रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.
भामरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला घेरण्याची वेळ आली आहे. आता खूप झाले, प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक होत असून, या बैठकीत माझी भूमिका हीच असेल. लंडनमध्ये गेल्यानंतर सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादासंदर्भात मी जगातील संरक्षणमंत्र्यांपुढे भूमिका मांडलेली आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे अमेरिका फ्रान्ससह इतर देशांसोबत झालेल्या बैठकीत भूमिका मांडली होती. पाकिस्तानसोबत असलेल्या देशांनी दहशतावादासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
- महेंद्र महाजन - सकाळ वृत्तसेवा

रविवार, 18 सप्टेंबर 2016 - 12:27 PM IST

No comments:

Post a Comment