Saturday, 24 September 2016

पर्यटकांविना नंदनवन काश्‍मीर सुने...

अस्थिरतेचा परिणाम; तीन हजार कोटींचा फटका


श्रीनगर - दहशतवादी बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्‍मीरमध्ये दोन महिन्यांपासून परिस्थिती अस्थिर आहे. संचारबंदी व फुटीरतावादी नेत्यांनी पुकारलेल्या संपामुळे भारताच्या या नंदनवनाला अवकळा आली आहे. सततच्या हिंसाचारामुळे भारतीयच नाही तर जगभरातील पर्यटकांनी पाठ फिरविल्याने येथील पर्यटन व्यवसायाला तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.


पर्यटकांअभावी काश्‍मीर सुने
काश्‍मीरच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भार पर्यटनावर असतो. जगभरातून लाखो पर्यटक येथील सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. कोणत्याही ऋतूत गेले तरी काश्‍मीरचे वेगळेपण नजरेत भरते. पण सध्याच्या अस्थिरतेमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला असून त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जम्मू-काश्‍मीर पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक शाहीद इक्‍बाल चौधरी म्हणाले, "गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग व अन्य ठिकाणच्या महामंडळाच्या हॉटेलमधील फक्त दोन ते चार टक्के खोल्या भरल्या आहेत. नेहमी या काळात 90 ते 100 टक्के खोल्या भरलेल्या असतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येतही 90 ते 95 टक्के घट झाली आहे.‘‘ जुलै 2015 ते सप्टेंबर 2015 या कालावधीत सुमारे तीन लाख पर्यटकांनी काश्‍मीरला भेट दिली. यंदा याच कालावधीत यात लक्षणीय घट झाली आहे. एक ते 12 ऑगस्ट 2016 या काळात केवळ 10 हजार 59 पर्यटकांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या बारा दिवसांत 89 हजार 243 पर्यटक येथे आले होते. पर्यटकच नसल्याने येथील प्रेक्षणीय स्थळे, सरकारी व खासगी क्षेत्रातील हॉटेल ओस पडली आहेत, असे राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

विकासकामे रखडली

उन्हाळ्यात येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होणार होते. मात्र आता ते रद्द झाले असून काहींनी चित्रीकरणाचे ठिकाण बदलले आहे. पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहेच; शिवाय पंतप्रधान विकास योजनेंतर्गत काश्‍मीरमध्ये सुरु असलेल्या प्रमुख पायाभूत प्रकल्पही अर्धवट अवस्थेत बंद पडले आहेत. या योजनेअंतर्गत सध्याच्या व नवीन पर्यटन स्थळी विकासकामांसाठी 400 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यातून दासकुम, दूधपर्थी, कोकरनाग, व्हेरिनाग, पहलगाम व सलामाबाद (उरी) येथे काम सुरु आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही कामे लटकली आहेत, अशी माहिती पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
पुढील वर्षात परिणाम होणार
यंदा काश्‍मीरमधील पर्यटन व्यवसायाचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले असले तरी याचा फार मोठा धोका पुढील वर्षीच्या पर्यटनालाही पोचू शकतो, अशी भीती पर्यटनावर अवलंबून असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची चिन्हे आहेत.
घटते प्रवासी...
जुलै ते ऑगस्ट 2015 : 3 लाख
1 ते 12 ऑगस्ट 2015 : 89 हजार 243
1 ते 12 ऑगस्ट 2016 : 10 हजार 59
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येतही 90 ते 95 टक्के घट झाली आहे.
- शाहीद इक्‍बाल चौधरी, कार्यकारी संचालक, जम्मू-काश्‍मीर पर्यटन विकास महामंडळ

 

- - यूएनआय

No comments:

Post a Comment