Saturday, 24 September 2016

राफेल करारावर अखेर सह्या

तीन वर्षांच्या आत विमाने मिळण्यास सुरवात; अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात
नवी दिल्ली - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राफेल या लढाऊ जेट विमानांच्या खरेदी करारावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री जीन वेस ली ड्रायन यांच्या उपस्थितीत 36 राफेल विमाने घेण्याच्या 59 हजार कोटी रुपयांच्या या करारावर स्वाक्षरी झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षी झालेल्या फ्रान्स दौऱ्यावेळी त्यांनी फ्रान्स सरकारकडून 36 राफेल विमाने घेण्याचे जाहीर केले होते. राफेल खरेदीचा प्रस्ताव पूर्वीच्या यूपीए सरकारच्या काळापासून किमतीमुळे ताटकळला होता. नव्याने केंद्रात आलेल्या मोदी सरकारने आधीचा प्रस्ताव रद्द करत नव्याने विमान कंपनीबरोबर नव्हे; तर थेट फ्रान्स सरकारबरोबरच वाटाघाटी सुरू केल्या. मागील 16 महिने विमानांच्या किमतीबाबत भारताने अत्यंत संयमितपणे चर्चा करत साडेपाच हजार कोटी रुपये कमी करून घेतले. करारानुसार भारतातील कंपन्यांनाही तीन अब्ज युरोचे काम मिळणार आहे.

करार झाल्याच्या दिवसापासून, म्हणजे आजपासून 36 महिन्यांच्या आत ही विमाने भारतात येण्यास सुरवात होणार असून 66 महिन्यांच्या आत सर्व विमाने भारतात दाखल होतील, असे करारात नमूद करण्यात आले आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि यंत्रणा असलेल्या या विमानात भारतानेही आपल्या गरजेनुसार आवश्‍यक ते बदल करवून घेतले आहेत. भारतीय हवाई दलाकडे आतापर्यंत नसलेली "मेटिऑर‘ आणि "स्काल्प‘ ही दोन नवी क्षेपणास्त्रे राफेलवर असणार आहेत. राफेल खरेदीमुळे भारतीय हवाई दलाची सक्षम लढाऊ विमानांची प्रतिक्षा संपणार आहे.
राफेलमुळे काय शक्‍य?
150 किमी पल्ला असलेल्या मेटिऑर क्षेपणास्त्राच्या साह्याने भारतीय हद्दीतूनच पाकिस्तानमध्ये; तसेच उत्तर आणि ईशान्य सीमेवर अचूक हल्ला करता येऊ शकतो. भारताकडे कारगिल युद्धावेळीही अशाप्रकारची क्षेपणास्त्रे असली तरी त्यांचा पल्ला केवळ 50 किमी होता. पाकिस्तानकडेही अशा प्रकारची क्षेपणास्त्रे असून त्यांचा पल्ला फक्त 80 किमी आहे. राफेल करार झाल्यानंतर ही विनामे तयार करणाऱ्या फ्रान्समधील डॅसॉल्ट कंपनीने "मेक इन इंडिया‘मध्ये सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे.
राफेलची वैशिष्ट्ये
- 2 : चालक
- 10 हजार किलो : वजन
- 50 फूट : लांबी
- 4,700 लिटर : इंधन क्षमता
- 3,700 किमी : पल्ला
कसा सुटला पेच?
फ्रान्सबरोबरील वाटाघाटींमध्ये प्रामुख्याने किंमत कमी करणे, या विमानांबरोबर अत्याधुनिक क्षेपणास्त्रे मिळविणे आणि भारताला हव्या असलेल्या सुविधांबरोबरच विमानांच्या निर्मितीत पन्नास टक्के वाटा भारतीय कंपन्यांना देणे या मुद्यांचा समावेश होता. फ्रान्सचा मुख्य आक्षेप भारतीय कंपन्यांना निर्मितीच्या प्रक्रियेत सामील करुन घेण्याबाबत होता. भारतीय कंपन्यांकडून तयार होणारे भाग आणि त्यांचा दर्जा याबाबत फ्रान्सने हरकतीचे मुद्दे उपस्थित केलेले होते. भारताने मूळ किमतीत देऊ केलेल्या विमानांचा दर्जा आणि त्याबरोबर दिली जाणारी शस्त्रास्त्रे याबाबत हरकतीचे मुद्दे उपस्थित केले होते. कारण किमतीच्या तुलनेत मूळ विमानांचा दर्जा काहीसा कालबाह्य होणारा होता. त्यावर वाटाघाटी होऊन फ्रान्सने या विमानांना अत्याधुनिक अशी हवेतल्या हवेत मारा करु शकणारी क्षेपणास्त्रे देण्याचे मान्य केल्यानंतर पेच सुटला असे समजते.

शत्रूंवर वचक ठेवणारे अस्त्र - राफेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्स सरकारकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी अंतिम किमतीबाबत एकमत न झाल्याने केवळ विमान खरेदीचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर मे 2015 पासून सुरू झालेली चर्चा काही दिवसांपूर्वीच संपून आज करारावर सह्या झाल्या. किमतीबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर भारताच्या अथक प्रयत्नांमुळे कराराची किंमत 12 अब्ज युरोवरून 7.8 अब्ज युरोपर्यंत खाली आली. शिवाय, विमानात भारताने अधिक सुधारणा करवून घेतल्या आहेत. हे विमान अत्याधुनिक यंत्रणा आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याने पाकिस्तानसह चीनवरही दबाव निर्माण झाला आहे.
‘राफेल‘वरील क्षेपणास्त्रे
- मेटिऑर : या क्षेपणास्त्रामुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. रडारच्या साह्याने व्हिज्युअल रेंजच्याही (बीव्हीआर) पुढील लक्ष्याचा हवेतल्या हवेत भेद करणे, हे या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य असून, त्याचा पल्ला 150 किमी इतका आहे. त्यामुळे अटीतटीच्या क्षणी राफेल हे भारताच्या ताफ्यातील महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.
- स्काल्प : हवेतून जमिनीवर मारा करणारे हे दीर्घ पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 300 किमी इतका आहे.
कराराच्या पैशांची विभागणी
- 3.42 अब्ज युरो : केवळ 36 राफेल विमानांची किंमत
- 71 कोटी युरो : इतर शस्त्रे
- 170 कोटी युरो : भारताने सुचविलेल्या बदलांची किंमत
- उर्वरित रक्कम सुटे भाग आणि देखभाल खर्च
करारातील अतिरिक्त मुद्दे
- 75 टक्के विमाने कायम उड्डाणासाठी सज्ज असण्याच्या तयारीत हवी
- भारताच्या नऊ वैमानिकांना प्रकशिक्षण
- इस्रायली हेल्मेट माउंटेड डिस्प्ले
- ब्राह्मोस-एनजीचा अंतर्भाव
- पाच वर्षे फ्रान्सकडून देखभाल
- तंत्रज्ञानाचे संपूर्ण हस्तांतर
हवाई दल तुलना
चीन -

- लढाऊ विमाने - 1,366
- लष्करी वाहतूक विमाने - 228
- हेलिकॉप्टर - 336
भारत
- लढाऊ विमाने - 623
- लष्करी वाहतूक विमाने - 228
- हेलिकॉप्टर - 326
पाकिस्तान
- लढाऊ विमाने - 354
- लष्करी वाहतूक विमाने - 32
- हेलिकॉप्टर - 27
राफेल कराराचा प्रवास
- ऑगस्ट 2007 : मिग विमानांऐवजी नवी विमाने घेण्यास केंद्र सरकारची मंजुरी
- जानेवारी 2012 : डॅसॉल्ट या कंपनीला राफेल विमान पुरविण्याचे कंत्राट. मात्र तांत्रिक कारणांवरून करार लांबला
- सुरवातीला 126 विमाने घेण्याची तयारी.
- एप्रिल 2015 : 36 विमाने खरेदीवर शिक्कामोर्तब
- मे 2015 : किमतीबाबत चर्चा सुरू
- 23 सप्टेंबर 2016 : करार पूर्ण

लांबी : 15.3 मीटर
पंखांचे क्षेत्रफळ : 46 चौरस मीटर
पंखांचा विस्तार : 10.8 मीटर
क्षमता : दोन वैमानिक, बहुउद्देशीय लढाऊ विमान
कार्यरत : डिसेंबर 2000 पासून
कमाल वजन : 24,500 किलो
कमाल वेग : 1,910 किमी/प्रतितास
युद्ध परीघ : 1,850 किमी
शस्त्रसज्जता : 30 मि.मी.ची तोफ, 9.5 टनांची क्षेपणास्त्र वाहण्याची क्षमता

 

- - पीटीआय

No comments:

Post a Comment