Saturday, 24 September 2016

भारत दहशतवादासमोर झुकणार नाही: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानवर टीका
कोझिकोड - ‘21 वे शतक आशियाचे असेल‘ हे कित्येक वर्षांपासून आपण ऐकत आहोत. हे सत्यात उतरण्यासाठी सर्व क्षमता येथे आहे. हे शतक आपले असेल, असे स्पष्ट संकेतही मिळत आहेत. यात आशियातील प्रत्येक देश स्वत:चे योगदान देण्यासाठी प्रयत्नही करत आहे. पण आशियात एक देश असा आहे, जो याच्या विरोधात काम करत आहे, पूर्ण आशियात रक्तरंजित होण्यासाठी आणि दहशतवादाची कटकारस्थाने रचण्यातच गुंग आहे.‘ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत दहशतवादासमोर कधीही झुकलेला नाही आणि यापुढेही झुकणार नाही‘, अशा शब्दांत पाकिस्तानला फटकारले आहे.
भारतीय जनता पक्षाची बैठक आज (शनिवार) येथे झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "आशियामध्ये जिथे जिथे दहशतवादी हल्ले होत आहेत, ते सर्व याच देशाला गुन्हेगार मानत आहेत. फक्त भारतच नाही, हे सर्वच देशांचे मत आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा शेजारचे सर्व देश असो, जगात कुठेही दहशतवादी हल्ल्याची बातमी येते, त्यानंतर अशीही बातमी येते की एकतर दहशतवादी या देशातून गेलेला असतो किंवा हल्ला झाल्यावर लादेनप्रमाणे त्याच देशात जाऊन आश्रय घेत असतो.‘

मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

  • जगाच्या कुठल्याही देशामध्ये असलेल्या केरळी व्यक्तीकडे आदरानेच पाहिले जाते. हा या भूमीचा वारसा, संस्कार आहे. काही दिवसांपूर्वी आखाती देशांमध्ये जाण्याचा योग आला होता. आखाती देशांमधील भारतीयांमध्ये केरळी नागरिकच सर्वाधिक आहेत. आखाती देशांमध्ये कुणालाही भेटले, की ते तेथील भारतीयांचे, केरळी नागरिकांचे कौतुक करतात. ते ऐकून अभिमान वाटतो.
  • याच मैदानावर काही वर्षांपूर्वी मी एका राजकीय सभेत भाषण केले होते. हेलिपॅडपासून इथपर्यंत रस्ताभर उत्साही लोकांची गर्दीच गर्दी दिसली. पन्नास वर्षांपूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्यय यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. पन्नास वर्षांमध्येच या संघातून स्थापन झालेला राजकीय पक्ष या लोकशाहीतील सर्वांत ताकदवाद पक्ष बनला आणि सत्ता स्थापन करून देशाची सेवा करू लागला आहे. महात्मा गांधी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि राम मनोहर लोहिया यांची विचारसरणी आणि संस्कार आजही भारतीय राजकारणामध्ये दिसून येतात.
  • पंतप्रधान म्हणून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये केलेल्या माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हटले होते, की हे सरकार गरिबांसाठी काम करेल. या शब्दांमागे महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची प्रेरणा होती. सत्तेच्या राजकारणामध्ये येण्यापूर्वी मी अनेक वर्षे संघटनेचे काम केले आहे. केरळमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. केरळमध्ये पक्षाला कधीही सत्ता मिळाली नाही; तरीही कार्यकर्त्यांनी संघर्ष चालूच ठेवला.
  • केरळमधील कार्यकर्ते हे देशातील सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक आहेत. तुम्ही जी तपस्या केली आहे, यातना सहन केल्या आहेत, हे बलिदान कधीही वाया जाणार नाही, केरळमध्ये भाजपची सत्ता येईल आणि हाच पक्ष राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाईल. देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य बनण्याची केरळमध्ये क्षमता आहे. हे साध्य करण्यासाठी केंद्रातील "एनडीए‘चे सरकार आणि भाजप पूर्ण मदत करेल. ‘सबका साथ, सबका विकास‘ हाच विकासाचा मंत्र घेऊन देश विकासाच्या मार्गावर आहे. मच्छिमार असो वा उद्योजक, सर्वांना नवी संधी आणि नवी ताकद देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज आहे.
  • उरीतील हल्ल्यानंतर पूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट आहे. शेजारी देशाचे ‘निर्यात‘ केलेल्या दहशतवाद्यांनी उरीत हल्ला केला आणि आमचे 18 जवान हुतात्मा झाले. हा देश ही गोष्ट कधीही विसरणार नाही. गेल्या काही महिन्यांत 17 वेळा वेगवेगळ्या गटांनी भारतात घुसण्याचे प्रयत्न केले. पण आपल्या शूर जवानांनी हे 17 प्रयत्न उधळून लावले. 110 हल्लेखोरांना तिथेच कंठस्थान घालण्यात आले. शेजारी देश एकाच कटात यशस्वी झाला आणि आपले 18 जवान हुतात्मा झाले. त्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले असते तर देशासमोर किती मोठे संकट उभे ठाकले असते, याची जाणीव असायला हवी. देशातीला सर्व नागरिकांना भारतीय लष्कराचा अभिमान आहे. देशातील सर्व सुरक्षा दलांचे जवान दहशतवादाविरोधातील लढाई जिंकत आहेत. ‘अत्याधुनिक शस्त्रे‘ हेच एकमेव कारण नाही. देशाचे मनोधैर्य हेदेखील दहशतवादाविरोधातील लढाईल सैन्य दलांचे सामर्थ्य असते. हे सामर्थ्य आपल्या सुरक्षा दलांकडे आहे.
  • हजारो वर्षे भारताबरोबर आम्ही लढू‘ अशा वल्गना त्या देशाचे नेते करत असत. पण काळाच्या ओघात ते कुठे नष्ट झाले, त्यांनाही कळाले नाही. त्या देशाचे आजचे नेते दहशतवाद्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून दाखवत काश्‍मीरचे रडगाणे गात आहेत. मी इथून आज पाकिस्तानच्या जनतेशी बोलू इच्छितो. जगाला पाकिस्तानकडून कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. पाकिस्तानच्या जनतेला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो, की 1947 पूर्वी तुमचे पूर्वजही याच देशाला स्वत:चा देश मानत होते. पाकिस्तानच्या जनतेने जरा स्वत:च्या नेत्यांना विचारावे.. पूर्व बंगालही तुमच्याकडे होते.. त्याला तर सांभाळू शकलेले नाही.. तुम्ही सिंध प्रांताला, बलुचिस्तानला, गिलगिटलाही सांभाळू शकत नाही आणि आता काश्‍मीरच्या वल्गना करत तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. जे तुमच्या हातात आहे, ते तरी आधी सांभाळून दाखवा..! भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण भारत जगामध्ये सॉफ्टवेअरची निर्यात करतो आणि पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे.. याचे कारण काय, हे पाकिस्तानच्या जनतेने त्यांच्या राज्यकर्त्यांना विचारायला हवे. तुम्हाला मूर्ख बनविण्यासाठी ‘भारताशी हजारो वर्षे युद्ध करण्याच्या वल्गना करत होते. आज मी तुमचे हे आव्हान स्वीकारतो. लढायचेच असेल, तर गरीबीच्या विरोधात लढाई करू.. बघू.. कोणता देश सर्वांत आधी स्वत:च्या देशातील गरीबी दूर करेल. पाकिस्तानच्या जनतेलाही हे आवडेल.. बेरोजगारी दूर करण्याची लढाई करू.. मग बघू, भारत जिंकतो की पाकिस्तान..! नवजात शिशू भारतामध्येही जीव गमावतात आणि पाकिस्तानमध्येही.. या नवजात बालकांना आणि त्यांच्या मातांना वाचवण्यासाठीची लढाई लढू.. मग बघू भारत जिंकतो की पाकिस्तान..!

No comments:

Post a Comment