Friday, 30 September 2016

व्यूहरचनात्मक कोंडीत पाकिस्तान - एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

 

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या नियंत्रित हल्ल्याने पाकिस्तानला व्यूहरचनात्मक, आर्थिक, राजकीय आणि लष्करी कोंडीत पकडले आहे. अशा हल्ल्यासाठी सक्षम गुप्तचर यंत्रणा आणि अचूक नियोजन आवश्‍यक असते.

पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेला नियंत्रित हल्ला म्हणजे माझ्या दृष्टीने उरीतील सतरा हुतात्मा जवानांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. योग्य वेळी नेतृत्वाने केलेली ही कारवाई आहे. जगात उच्छाद मांडलेल्या दहशतवादाविरुद्ध हा नियंत्रित हल्ला केला आहे. उरीच्या हल्ल्यानंतर व्यूहरचनात्मक गोष्टी सुरू होत्या. संयुक्त राष्ट्र संघातही यावर चर्चा झाली. तसेच, इतर देशांच्या व्यासपीठावरही हा ज्वलंत प्रश्‍न मांडण्यात आला.

नियंत्रित हल्ल्यासाठी शत्रूच्या गोटातील अचूक माहिती आवश्‍यक असते. त्यात सामान्य नागरिकाचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे भारतीय लष्कराने उरी हल्ल्यानंतर कोणताही उतावळेपणा दाखविला नाही. हवामानासह प्रत्येक बारीक-बारीक गोष्टीचा अभ्यास करून या हल्ल्याचे नियोजन केले होते.

नियंत्रित हल्ले म्हणजे काय?

नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ आहेत. तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आणले जाते आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले केले जातात. या दहशतवादी तळांची इत्थंभूत अचूक माहिती भारतीय लष्कराने मिळविली. गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी तळांची माहिती मिळाल्याने त्यांच्यावर हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांमध्ये अत्याधुनिक साधनेही वापरली जातात. त्यामुळे सर्व अभ्यास करून भारतीय लष्कराने हा हल्ला केला. स्पेशल फोर्सेसने ही कारवाई केली. त्यांना हेलिकॉप्टरने पटकन दहशतवादी तळांवर उतरले आणि ही कारवाई पूर्ण केली. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये ही कारवाई केली.

पाकिस्तानचा दुतोंडी व्यवहार

पाकिस्तान लष्कराकडून पुरस्कृत केलेला दहशतवाद, असे वारंवार आपण जागतिक समूहाला सांगितले आहे; पण प्रत्येक वेळी पाकिस्तानने हे फेटाळले. एकीकडे पाकिस्तान दहशतवादाला मदत करत नाही, असे सांगितले जाते; मग दुसरीकडे भारताने कारवाई केली तर पाकिस्तान लष्कराने त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाच्या विरोधात बातचीत करायची, आमचा देश दहशतवादी हल्ल्यांनी होरपळत आहे, असे चित्र निर्माण करायचे, अशी दुटप्पी भूमिका पाकिस्तानने ठेवली आहे. जगभरात झालेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळाले आहे, हे सर्वांना माहीत आहे. पाकिस्तान स्वतः म्हणतो, की आम्हाला दहशतवाद नको. त्यामुळे पाकिस्तानचा व्यवहार हा दुतोंडी आहे.

जगभरातून भारताला पाठिंबा

जागतिक मत भारताच्या बाजूला आहे. कोणताही अभिमान असलेला देश सारखा मार खात बसत नाही. त्यामुळे आपण आपले संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. दुसरे देश सारखे आपल्या मदतीला येणार नाहीत. आपल्याला जगभरातून नक्कीच पाठिंबा आहे. त्याबाबत तसे जागतिक मत आपण तयार केले आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्यांना नाकारले आहे. पाकिस्तानी लष्कराचा भस्मासुर झालेला आहे. ते फक्त लष्कर नाही, तर त्यांनी स्वतःच तयार केलेली आर्थिक शक्ती आहे. प्रत्येक व्यवसायात लष्कर असते. प्रत्येक महत्त्वाचे पद धरून पाकिस्तान सरकार चालविले जाते. बांगलादेशानेही या कामगिरीचे समर्थन केले आहे. दहशतवादाच्या विरुद्ध केलेल्या कारवाईचे प्रत्येक देश समर्थन करेल.

स्पष्ट राजकीय संकेत

लष्कराने आज केलेल्या कारवाईतून पाकिस्तानला खूप मोठा राजकीय संदेश दिला आहे. देशातील सर्व पक्षांनी या कारवाईला एकमुखी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण देश याच्या मागे ठामपणे उभा आहे. सशस्त्र सेनेच्या मागे कोणतीही राजकीय भूमिका नसते. ते फक्त राजकीय नेतृत्वाच्या होकाराची वाट पाहत असतात. हे इतक्‍या दिवस काही आपण करत नव्हतो; पण दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आता व्यूहरचनात्मक, आर्थिक, राजकीय आणि लष्करी असे वेगवेगळे पर्याय आपल्याकडे आहेत. वेळ लागली तर हे पर्याय आपण वापरू, असेही यातून स्पष्ट होते.

पुढे काय होईल?

पाकिस्तान हा सहजासहजी ऐकणारा देश नाही. ते खूप आरडा-ओरडा करणार. त्यांचे लष्कर आता ‘बॅक फुट’वर आहे. भारतीय लष्कर हे पाऊल उचलू शकते, असे त्यांना समजले आहे. आपल्या पुरस्कृत दहशतवादावरच हल्ला चढविला आहे. त्यामुळे ते अजून दहशतवादी हल्ल्यांचा प्रयत्न करणार. त्यांना लढाई करायची नाही. त्यांना दहशतवादी छुपे हल्ले करायचे आहेत. अण्विक शक्ती ही भयंकर आहे.

(शब्दांकन - योगीराज प्रभुणे)

No comments:

Post a Comment