Saturday, 24 September 2016

रशियाचे सैनिक पाकमध्ये दाखल

दोन आठवड्यांच्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन
इस्लामाबाद - शीत युद्धाच्या काळात परस्परांच्या विरोधात असलेले पाकिस्तान आणि रशिया हे दोन देश सध्या जवळ येत आहेत. दोन्ही देशांतील नियोजित संयुक्त लष्करी सरावासाठी रशियाच्या सैनिकांचे पथक पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्‍त्याने आज ही माहिती दिली. पाकिस्तान आणि रशिया यांच्यातील हा पहिलाच लष्करी सराव आहे.

‘पहिल्या संयुक्त लष्करी सरावासाठी रशियाच्या सैनिकांचे पथक पाकिस्तानात दाखल झाले आहे. 24 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर दरम्यान चालणाऱ्या लष्करी सरावात ते सहभागी होणार आहेत,‘‘ असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असीम बाज्वा यांनी सांगितले. या संयुक्त लष्करी सरावाला "मैत्री 2016‘ असे नाव देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रशिया आणि पाकिस्तान यांच्यात भविष्यात लष्करी सहकार्यात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अत्याधुनिक लढाऊ विमानांची रशियाकडून खरेदी करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला असल्याचे मानले जाते. "तालिबान‘चा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात जाऊन अमेरिकी सैनिकांनी ठार केले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून परराष्ट्र धोरणात बदल करण्याचे संकेत मिळत होते. मागील 15 महिन्यांत पाकिस्तानच्या संरक्षण दलाच्या तिन्ही विभागांच्या प्रमुखांनी रशियाचा दौरा केला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असताना शीत युद्धाच्या काळात परस्परांच्या विरोधात असलेल्या पाकिस्तान आणि रशिया यांच्यात जवळीक वाढताना दिसते आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्यात वाढ होत असल्यामुळे त्याला शह देण्यासाठी रशिया पाकिस्तानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे, असे सांगितले जाते.

- - पीटीआय

No comments:

Post a Comment