Saturday, 24 September 2016

काश्‍मिरातील स्थितीबाबत राजनाथ-पर्रीकर यांची चर्चा

नवी दिल्ली - उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच अंतर्गत सुरक्षेचा आणि पुढील महिन्यात गोव्यामध्ये होणाऱ्या "सार्क‘ परिषदेच्या सुरक्षेचाही या दोघांनी आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

गृहमंत्रालयात दुपारी बाराच्या सुमारास दोन्ही मंत्र्यांची बैठक झाली. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात 18 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाईसाठी सरकारवर दबावही येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राजनाथसिंह आणि पर्रीकर यांनी अर्धा तास चाललेल्या या बैठकीदरम्यान काश्‍मीरमधील परिस्थिती, तसेच नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. सीमेवर होणारी घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नौदल तळाच्या परिसरात संशयितांचा वावर असल्याची माहिती याबाबतही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. "ब्रिक्‍स‘ परिषदेच्या सुरक्षेचाही मुद्दा या चर्चेत होता असे सांगण्यात आले. गोव्यात (पणजी) 15 व 16 ऑक्‍टोबरला ही परिषद होणार आहे. यात भारताव्यतिरिक्त ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचे उच्चस्तरीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात या परिषदेची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्याबाबतही गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांनी आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

- - सकाळ न्यूज नेटवर्क

No comments:

Post a Comment