Thursday 22 September 2016

काश्‍मीरप्रश्‍न सुटल्याशिवाय शांतता नाही: शरीफ

न्यूयॉर्क - काश्‍मीर प्रश्‍न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही, अशी गर्भित धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केलेल्या भाषणात बुधवारी दिली. याचवेळी काश्‍मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

शरीफ यांनी भाषणाची सुरवात केल्यापासून जगभरातील इस्लामी हिंसाचार आणि त्यामुळे निर्माण झालेले भयाचे वातावरण याचा उल्लेख केला. याचा फटका पाकिस्तानला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. काश्‍मीरमधील परिस्थितीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले. पेलेट गनचा वापर, त्यामुळे जखमींची स्थिती, त्यांना मिळत नसलेले उपचार याचे अवाजवी वर्णन त्यांनी भाषणात केले. मात्र, पाकिस्तानच्या भूमीवरून होणारा दहशतवाद आणि दहशतवादांना मिळत असलेले प्रोत्साहन हे मुद्दे त्यांनी टाळले. पाकिस्तान चर्चेसाठी कायम तयार आहे; मात्र भारत आधीच अटी लादून चर्चा करण्यासाठी येत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला न्याय देत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

लष्कराशी चकमकीत मारला गेलेला हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हाण वणी याचा उल्लेख करताना शरीफ यांनी त्याला काश्‍मीरचा "हीरो‘ असे संबोधले. काश्‍मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य हवे असून, शांततेने त्यांना आंदोलन करण्याचा हक्क मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी काश्‍मीर लष्करमुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करण्याचा आग्रह त्यांनी केला.

दरम्यान, शरीफ यांचे आज भाषण असल्याने भाषण सुरू होण्यापूर्वी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी येथे निदर्शने केली.
उरीतील हल्ल्याचा उल्लेख नाही
आंतरराष्ट्रीय तसेच विभागीय पातळीवरील संबंधांमधील तणावाचे वर्णन नवाज शरीफ यांनी भाषणात केले. मात्र, उरीतील दहशतवादी हल्ला आणि त्यात हुतात्मा झालेल्या जवानांबाबत त्यांनी मौन बाळगले. संपूर्ण भाषणात त्यांनी पाकिस्तानातून कारवाया करीत असलेल्या एकाही दहशतवादी संघटनेचा तसेच, बलुचिस्तानमधील नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेखही केला नाही.

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment