नौदलातील वरिष्ठ खलाशांच्या एकात्मिकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठीच्या नव्या उपक्रमांतर्गत मुंबईत पश्चिम नौदल कमांडतर्फे पहिल्या मास्टर चीफ पेट्टी ऑफिसर्स (एमसीपीओ) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे आज सकाळी उद्घाटन झाले. एमसीपीओ या प्र वर्गात नौदलातील सर्वात वरिष्ठ खलाशांचा समावेश असतो आणि ते अत्यंत अनुभवी असतात. या खलांशाचे अनुभव आणि कुशलता समावेशक व्यवस्थापक पद्धतीने विश्लेषणाच्या माध्यमातून व्यावसायिक स्वरुपात मांडणारी ही अशा प्रकारची खलाशांची पहिली परिषद आहे. या परिषदेत नौदल परिचालन, मनुष्यबळ संबंधी मुद्दे, तांत्रिक आणि प्रशासकीय आव्हाने, देखभाल आणि माहिती तंत्रज्ञानाचा समावेश अशा विविध मुद्दयांबाबत चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक मधल्या नौदल एककांमधले एमसीपीओ या परिषदेत सहभागी होत आहेत. परिषदेचे कार्यक्रम पत्रक तयार करणे, सादरीकरण, चर्चा आणि योग्य कार्यवाहीची जबाबदारी वरिष्ठ खलाशांवर आहे.
यावेळी बोलताना व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांनी बौद्धिक सक्षमीकरणासह सर्व स्तरांवरील सक्षमीकरणावर भर दिला. विश्लेषण आणि चर्चांमध्ये सर्व सहभागींनी योगदान द्यावे अशी विनंती त्यांनी केली.
ही बैठक वार्षिक तत्त्वावर आयोजित केली जाणार आहे.
PIB Release/MH/220
No comments:
Post a Comment