Wednesday, 5 October 2016

पाकवर धाकासाठी 'शिवनीती'ची गरज -श्रीनिवास सोहोनी

पुणे - ""पाकव्याप्त काश्‍मीरमधील "सर्जिकल स्ट्राइक‘नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्वक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आण्विक शस्त्रांचा पहिल्यांदा वापर न करण्याच्या धोरणाचा फेरविचार झाला पाहिजे, असे मत मांडताना ""पाकिस्तानला धाक बसविण्यासाठी "शक्ती आणि युक्ती‘बरोबरच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती अवलंबण्याची गरज आहे,‘‘ असे प्रतिपादन प्रशासन व धोरणविषयक तज्ज्ञ श्रीनिवास सोहोनी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

"सकाळ साप्ताहिक‘च्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "भारताची सुरक्षितता ः काही पैलू‘ या विषयावर सोहोनी बोलत होते. या वेळी "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार, समूह संपादक श्रीराम पवार आणि पुणे आवृत्तीचे संपादक मल्हार अरणकल्ले व्यासपीठावर उपस्थित होते.

सोहोनी म्हणाले, ""उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबतच्या धोरणात मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध नमते न घेता आपल्या बाजूने संयम राखून चोख प्रत्युत्तर द्यायचे, असे धोरण भारताने स्वीकारले आहे. त्याचा फायदा निश्‍चितच आपल्याला होईल. पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती या पुढेही सुरू राहतील. दहशतवादी हल्ले वाढतील. बनावट नोटा, अमली पदार्थ भारतात पेरण्याचे प्रमाणही वाढेल. पण, त्याला योग्य वेळी शक्तीने आणि अधिकाधिक युक्तीने प्रत्युत्तर दिले पाहिजे.‘‘

""त्या वेळीही (सतरावे शतक) परकीय राजवटींनी या भूमीत प्रचंड आक्रमणे केली; मात्र त्यांनी त्यांचा निःपात केलाच ना, आपल्या शिवाजीमहाराजांनी. त्यांनी शक्तीबरोबरच युक्तीचा वापर केला आणि सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याचा लढा दिला,‘‘ याची आठवण करून देताना सोहोनी यांनी औरंगजेबच्या साताऱ्यावरील स्वारीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ""सातारचा वेढा सुरू असताना तिकडे किल्ल्यावरून लढत लढत मावळ्यांची एक तुकडी खाली आली आणि त्यांनी औरंगजेबचे अनेक सैनिक ठार केले. अखेरीस त्यांना पकडून औरंगजेबपुढे उभे करण्यात आले तेव्हा त्याला धक्का बसला. कारण त्या लढवय्या सैनिकांमध्ये नऊ मराठे आणि चार मुस्लिम होते. माझ्या मृत्युपश्‍चात आपले काहीही उरणार नाही, असे उद्‌गार औरंगजेबने त्या वेळी काढले. महाराजांनी सर्व जातिधर्मांना आपलेसे केले होते.‘‘

युद्ध कोणाच्याच फायद्याचे नाही, असे सांगताना सोहोनी म्हणाले, ""लष्करी कारवाईमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. या दोन्ही देशांमध्ये शांतता राखता आली तर चांगले; पण गरज पडल्यास लष्करी कारवाई केली पाहिजे. सिंधू पाणी करारातून आपल्याला काही फायदा नसल्याने त्यातील अटी व बंधनांचा फेरविचार होण्याची गरज आहे. त्यातून पाकिस्तानवर कायम दबाव राखता येईल.‘‘

""परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. त्यातून सौदी अरेबियाशी यापूर्वी कधी नव्हते इतके संबंध चांगले झाले आहेत. अमेरिकेशी खूप चांगल्या पद्धतीने संबंध सुधारले आहेत. तसेच, शेजारील नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका यांना दिलेल्या आर्थिक मदतीने यांच्याशी संबंध दृढ होत आहेत. असे चांगले संबंध दीर्घकाळ टिकविण्यासाठी दररोज पराकाष्ठा करावी लागेल,‘‘ असे त्यांनी स्पष्ट केले.

सोहोनी म्हणाले, ""आदर्शवाद, दुसऱ्यावर विश्‍वास ठेवणे हे काही प्रमाणात महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यूहात्मक दृष्टीने हे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हावा. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय नेतृत्वाने भातृभाव स्वीकारला होता. त्यातून लष्कराला सावत्र आईसारखी वागणूक दिली गेली. तोफा, हत्यारे, दळणवळण, रस्ते, रणगाडे, पूल या विषयांचा जनरल थोरात यांचा अहवाल बाजूला ठेवण्यात आला. दुसरीकडे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले रशिया, चीन, अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि युरोप यांना जोडणारे मार्गही बंद झाले. त्याचा फायदा पाकिस्तान आणि चीनला झाला.‘‘
श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सकाळ साप्ताहिकाच्या सहसंपादक ऋता बावडेकर यांनी केले.


भारताने गमावलेल्या संधी
- 1949 काश्‍मीरमधून घुसखोरांना हुसकविले होते; पण "जैसे थे‘चे धोरण स्वीकारले.
- 1962 चीन युद्धात भारताने हवाई दलाचा वापर केला नाही.
- 1965 पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात जिंकलेला हाजीपीर पास ताश्‍कंद करारात परत दिला.
- 1972 या युद्धात पाकिस्तानचे 92 हजार सैनिक ताब्यात असताना जिंकलेला प्रदेश परत केला.
- 1998 गुप्तचर यंत्रणा शिथिल करण्याचा निर्णय

-श्रीनिवास सोहोनी

- - सकाळ वृत्तसेवा

No comments:

Post a Comment