न्यूयॉर्क -आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्नाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा चपराक बसली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही, असे मत "यूएन‘मधील रशियाच्या राजदुताने व्यक्त केले.
पंधरा सदस्य असलेल्या "यूएन‘च्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ऑक्टोबर महिन्यासाठी रशियाकडे आहे. सुरक्षा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष व "यूएन‘मधील रशियाचे राजदूत व्हिटाली चर्कीन यांना सोमवारी झालेल्या वार्तालापा वेळी पत्रकारांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीसंबंधात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देण्यास नकार देत चर्कीन म्हणाले की, कृपया या विषयाबाबत कुठलाही प्रश्न विचारू नये. पत्रकारांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले की, मी सध्या "यूएन‘च्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे. सुरक्षा परिषदेत भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा सध्या केली जात नाही. त्यावर पत्रकारांनी पुन्हा एकदा छेडले असता ते म्हणाले की, त्या विषयापेक्षा अनेक विषय आमच्या समोर आहेत.
चर्कीन यांच्या प्रतिक्रियेमुळे एकप्रकारे पाकिस्तानला चपराक बसल्याचे मानले जाते. मागील आठवड्यात "यूएन‘च्या आमसभेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या दाव्यांबाबत "यूएन‘ची भूमिका काय आहे, असा प्रश्न "यूएन‘चे अध्यक्ष बान की मून यांच्या प्रवक्त्याला विचारला असता त्यांनी स्पष्ट केले की, याबाबत आम्ही पूर्वीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा मत व्यक्त करण्याची गरज नाही.
- - पीटीआय
No comments:
Post a Comment