Wednesday 5 October 2016

भारतीय हद्दीतून पाकिस्तानी नौका जप्त

अमृतसर - भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानी एक नौका सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी ताब्यात घेतली. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात रावी नदीत ही रिकामी नाव निदर्शनास आली होती. दोन दिवसांपूर्वी तटरक्षक दलाने गुजरातमधून एक पाकिस्तानी नौका जप्त केली होती.

प्राथमिक चौकशीत या नौकेवर काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे "बीएसएफ‘चे संचालक के. के. शर्मा यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी उरीतील लष्करी तळावर केलेला हल्ला व भारताने पाकव्याप्त काश्‍मीवर केलेल्या "सर्जिकल‘ हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर रावी नदीवरील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानची नौका वाहत येथे आल्याचे "बीएसएफ‘चे पंजाब विभागाचे उपमहानिरीक्षक आर. एस. कटारिया यांनी सांगितले. या नौकेत काहीही नव्हते. पाण्याची पातळी वाढल्याने तिचे नांगर सुटून ती भारतीय हद्दीत आल्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला येथे "बीएसएफ‘च्या छावणीत झालेल्या "मैत्रीपूर्ण गोळीबारा‘त एक जवान मारला गेल्याचे वृत्त कटारिया यांनी फेटाळून लावले. हा हल्ला रात्री उशिरा झाला. त्या वेळी दाट काळोख असल्याने गोळीबार कोठून झाला, हे सांगणे अवघड आहे.

- - पीटीआय

No comments:

Post a Comment