Sunday, 23 October 2016

तर थेट पाकिस्तानात हल्ले करु: अमेरिका -- वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - आयएसआय ही पाकिस्तानमधील गुप्तचर संस्था देशातील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नसल्याचे निरीक्षण नोंदवित अमेरिकेने "गरज वाटल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर थेट हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही,‘ असा इशारा दिला आहे.

पाकिस्तानी सरकारमध्ये विशेषत: आयएसआयमध्ये येथील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यास तयार नसलेले घटक आहेत, ही खरी समस्या आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांपैकी काही संघटनांना मोकळे रान मिळत आहे; वा परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर असू शकते. पाकिस्तानमधील आमच्या भागीदारांना तेथील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी, असे आमचे आवाहन आहेच. आमची त्यांना मदत करावयाचीही तयारी आहे. मात्र दहशतवादास मिळणारी आर्थिक मदत रोखण्याकरिता पाकिस्तानबरोबर काम करण्यास आम्ही कटिबद्ध असलो; तरी गरज पडल्यास एकट्याने कारवाई करुन दहशतवादी संघटना उध्वस्त करण्यास अमेरिका मागेपुढे पाहणार नाही,‘‘ असे दहशतवादास मिळणाऱ्या आर्थिक मदतीस रोखण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या विभागाचे अतिरिक्त मंत्री अदम स्झुबिन यांनी म्हटले आहे. याचवेळी, पाकिस्तान हा अमेरिकेच्या दहशतवादविरोधी धोरणामधील एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानमधील नागरिक हे स्वत: देशात सर्वत्र होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरत आहेतच. पाकिस्तानने देशाच्या वायव्य भागामधील पारंपारिक दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यामध्ये यश मिळविले आहे. मात्र इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना असल्यासंदर्भातील औपचारिक घोषणाही पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. शिवाय तेहरिक-इ-तालिबान या दहशतवादी संघटनेस मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर टाच आणण्याचा प्रयत्नही पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. मात्र आयएसआयकडून दहशतवादी संघटनांना केली जाणारी मदत, ही समस्या आहे, यात काहीही शंका नाही,‘‘ असे स्झुबिन म्हणाले.

No comments:

Post a Comment