Wednesday, 19 October 2016

भारतीय लष्कराची तुलना इस्राईलबरोबर -- पीटीआय

आपले जवान कमी नसल्याची मोदींकडून स्तुती
मंडी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय लष्कराची तुलना इस्राईलच्या लष्कराशी करत, आपले जवान इतर कोणत्याही देशापेक्षा कमी नाहीत, असे कौतुक केले आहे. येथे एका जलविद्युत प्रकल्पाचे उद्‌घाटन केल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘आपल्या लष्कराच्या शौर्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. इस्राईलच्या सैनिकांनीही अनेक वेळा सर्जिकल स्ट्राइक केल्याचे आम्ही ऐकले आहे. आपले जवानही इतर कोणत्याही देशाच्या लष्करापेक्षा कमी नाहीत, हे नुकतेच सर्वांनी पाहिले आहे.‘‘ शत्रू राष्ट्रांविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्याबद्दल इस्राईल प्रसिद्ध आहे. सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करत असल्यावरून सध्या विरोधी पक्ष भाजपवर टीका करत आहेत. मात्र, जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि पंतप्रधानांची प्रखर राजकीय इच्छाशक्ती प्रदर्शित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकचा अभिमानाने उल्लेख केला जात असल्याचे सांगत भाजपने सर्व आरोप फेटाळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांचे आज भाषण झाले.

आज मोदी यांनी याआधीच्या कॉंग्रेस आघाडी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘मागील चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेली "वन रॅंक वन पेन्शन‘ योजना आमच्या सरकारने लागू केली आहे. आधीच्या सरकारने केवळ मोठी आश्‍वासने दिली आणि काम मात्र केले नाही. आधीच्या काही सरकारमध्ये यासाठी दोनशे ते पाचशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्ष खर्चाचे विश्‍लेषण कधीही झाले नाही. हे विश्‍लेषण आम्ही केले आणि या योजनेसाठी दहा हजार कोटी आवश्‍यक असल्याचे समजले. कोणत्याही सरकारने एका फटक्‍यात इतका निधी कधीही दिला नाही.‘‘ हा निधी चार टप्प्यांत देण्याचे ठरले असून 5,500 कोटी रुपयांचा निधीचा पहिला टप्पा लष्कराकडे सुपूर्द करण्यात आला असल्याचेही मोदींनी सांगितले.

No comments:

Post a Comment