मुंबई - दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक शस्त्रे पाहता भारतीय लष्करानेही जवानांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये बदल सुचविले आहेत. सध्या नव्या बुलेटप्रुफ जॅकेटवर डीआरडीओ आणि लष्करातर्फे चाचण्या सुरू आहेत. लवकरच नवे जॅकेट जवानांना वापरता येणार आहे.
दहशतवादी हल्ल्यांसारखी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नव्या रचनेचे बुलेटप्रुफ जॅकेट लष्कराने सुचविले आहेत. नव्या जॅकेटचे वजन सध्याच्या जॅकेटनुसारच हवे, अशी मागणी आहे. जवानांच्या कामाचे तास पाहता जॅकेटच्या वजनाचा विचार करण्यात आला आहे. अत्याधुनिक शस्त्रांमध्ये एके 47 मध्येही गोळीचा वेग वाढलेला आहे. 730 मीटर प्रतिसेकंद या वेगाने येणाऱ्या गोळ्यांनुसार नव्या बुलेटप्रुफ जॅकेटची रचना करण्याची सूचना लष्कराने केला आहे. जॅकेटचे आयुष्यमान दहा वर्षांचे असावे, अशी मागणी आहे.
एखादी गोळी जॅकेटवर लागली तरीही त्याचा आघात अनेकदा शरीरात जखमा करणारा असू शकतो. म्हणूनच गोळी लागल्यानंतर 25 एमएमपेक्षा जास्त आघात सहन होईल, अशी जॅकेटची क्षमता अपेक्षित आहे. परदेशात वापरण्यात येणाऱ्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये 44 एमएमची क्षमता असते. नव्या जॅकेटचे वजन 10.4 किलोपेक्षा जास्त नसावे, असेही सुचविण्यात आले आहे. सध्या सैन्यातर्फे "जीएसक्यूआर 1438‘ मॉडेलचे जॅकेट वापरण्यात येते. दीड वर्षापूर्वी नव्या निकषांवर आधारित बुलेटप्रुफची मागणी सैन्याने केली होती. आता चाचणीसाठी काही जॅकेट देण्यात आली आहेत.
बुलेटप्रुफ जॅकेटवर चंडिगड येथील "टीबीआरएल‘ येथे संशोधन करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या काही जॅकेटची तपासणी सुरू आहे. सुमारे दीड लाख जॅकेटची लष्कराला गरज आहे. टप्प्याटप्प्याने हा पुरवठा केला जाईल, अशी माहिती "संरक्षण सामग्री तथा भांडार संशोधन आणि विकास संस्था‘चे अधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिली.
अशी होते चाचणी...
जवानांसाठी वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वातावरणात जॅकेटसचे आयुष्यमान वाढावे, या दृष्टीने जॅकेटसची चाचणी केली जाते. त्यात कमी तापमानापासून ते अतिउष्ण अशा वातावरणातही सुमारे 15 दिवस या जॅकेटची तपासणी होते. सुरक्षेच्या दृष्टीने शक्य तितक्या वेगवेगळ्या वातावरणांत ही चाचणी केली जाते.
- सकाळ वृत्तसेवा गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016 - 12:00 AM IST
No comments:
Post a Comment