नवी दिल्ली - नियंत्रण रेषा ओलांडून भारताने केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईनंतर परिस्थिती अद्यापही संवेदनशील असून, सर्व सैन्य दले कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी सांगितले.
आठ ऑक्टोबरला असलेल्या हवाई दल दिनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत अरूप राहा यांनी संवाद साधला. सर्जिकल स्ट्राइकबाबत थेट भाष्य करणे त्यांनी टाळले असले, तरी सर्व संकटांचा सामना करण्याची सुरक्षा दलांमध्ये क्षमता असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ""लष्कर, हवाई दल आणि नौदल अतिशय सज्ज आहेत; मात्र सध्याची परिस्थिती अद्यापही अत्यंत संवेदनशील असल्याने मी फार भाष्य करणार नाही. केंद्र सरकारकडे निर्णयाचे सर्वाधिकार आहेत.‘‘ सर्जिकल स्ट्राइकनंतर माध्यम प्रतिनिधींना सामोरे जाणारे एअर चीफ मार्शल राहा हे तिन्ही सेनादल प्रमुखांपैकी पहिलेच आहेत. या प्रकरणी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.
"एखादी परिस्थिती पाहून भारताची सैन्य दले क्षमता वाढवित नसून, ते भारताचे धोरणच आहे; मात्र परिस्थितीनुसारही बदल करता येतो. सध्याची संरक्षण खरेदी मात्र कोणत्याही घटनेचा परिणाम नसून, तो प्रक्रियेचाच एक भाग आहे,‘ असेही राहा यांनी स्पष्ट केले.
- - पीटीआय
No comments:
Post a Comment