Tuesday 11 October 2016

दहशतीला थारा देणाऱ्यांची गय नाही - मोदी

लखनौ - "दहशतवादाला थारा देणाऱ्यांची यापुढे गय करणार नाही,‘ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानचे नाव न घेता येथे दिला. दहशतवादाला कोणत्याही सीमा आणि मर्यादा नसतात, असे सांगतानाच त्यांनी दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना मुळापासून उखडण्याची गरजही व्यक्त केली. विजयादशमीनिमित्त येथील प्रख्यात ऐशबाग मैदानात आयोजित रामलीला कार्यक्रमात ते बोलत होते.

यंदाचा दसरा वेगळाच असेल, असे मोदींनी नुकतेच सांगितले होते. आज त्याचे प्रत्यंतर आले. "जय श्रीराम‘ने भाषणाची सुरवात करून मोदींनी दहशतवाद आणि तदानुषंगिक मुद्द्यांवर प्रथम बोलणे पसंत केले. ते म्हणाले, की दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून, त्याच्या विरोधात जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. "26/11‘च्या हल्ल्यानंतर दहशतवाद किती धोकादायक आहे याची जाणीव सगळ्या जगाला झाली. दहशतवादाचा खात्मा केल्याशिवाय मानवतेचे रक्षण करणे शक्‍य नाही. मात्र, आपण डोळे उघडे ठेवून दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले, तर त्यांना घातपाती कारवाया करता येणारच नाहीत. दहशतवादाने सीरियात काय धुमाकूळ घातला आहे हे आपण पाहतो आहोत. तेथील स्थिती पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. त्यामुळेच दहशतवाद संपविल्याशिवाय मानवतेच्या सुरक्षेची हमी देता येणार नाही हे लक्षात येईल. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आणि आपले जग उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारे आजचे "रावण‘ असल्याची टीका त्यांनी केली. रामलीलेनंतर केल्या जाणाऱ्या रावण दहनाचा उल्लेख करून ते म्हणाले, की एकत्र येऊन सामना केल्याशिवाय दहशतवादाचा नायनाट करता येणार नाही.

दहशतवादापासून आपण मुक्त आहोत असा कोणाचा समज असेल, तर तो चुकीचा असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की दहशतवाद हा विषाणू असून, तो आपल्या समजाला ग्रासत आहे. अस्वच्छता, दारिद्य्र आणि निरक्षरता हे आपल्या समाजातील आणखी काही "रावण‘ आहेत, आता त्यांचेही दहन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांना समान संधी द्यावी

महिलांचे हक्क आणि त्यांना समानता देण्याच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी भाषणात जोर दिला. ते म्हणाले, ""आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्यानिमित्ताने आपण लिंगभेदमुक्त भारत उभारण्याचा निश्‍चय केला पाहिजे. अशा देशात मुलींनाही चमकण्याची संधी मिळेल. स्त्रीचा धर्म कोणता आणि तिची पार्श्‍वभूमी काय, याचा विचार न करता तिला संधी मिळायला हवी.‘‘ रामायणातील जटायूचा उल्लेख त्यांनी केला. स्त्रीच्या सन्मानार्थ लढा देणारा जटायू हा पहिला योद्धा होता. आपण सगळे "राम‘ होऊ शकत नाही; पण दहशतवादाला दूर ठेवण्यासाठी "जटायू‘ नक्कीच होऊ शकतो, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment