1971 च्या भारत- पाक युद्धात शत्रूच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी विशेष पराक्रम गाजविला. त्यावेळच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत खास ‘ईसकाळ‘च्या वाचकांशी...
उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 28 सप्टेंबरच्या रात्री प्रत्यक्ष ताबारेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकविला... आणि या पराक्रमाच्या वार्ता ऐकताना माझ्या मनात माझ्या बटालियनच्या पराक्रमाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
1971 च्या डिसेंबर महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान घमासान युद्ध सुरू असताना आमची ‘14 ग्रेनेडियर‘ बटालियन सीमेवरील उरी, पूँच या भागात तैनात होती. युद्धाच्या त्या वातावरणात आम्हाला स्फूरण चढले होते. मृत्यूला जणू सोबतच घेऊन आम्ही मोठ्या हिरीरीने या लढाईत भाग घेण्यास सज्ज झालो होतो.
कायमस्वरुपी माझ्या स्मरणात राहील ती 16 डिसेंबरची रात्र... माझ्या बटालियनच्या चार कंपन्या प्रत्यक्ष ताबारेषेवर (एलओसी) तैनात होत्या. एका कंपनीत साधारणपणे 110 जवान असतात. त्यापैकी एका कंपनीचे कमांडर होते मेजर मेहमूद खान. अत्यंत धाडसी मेजर मेहमूद खान यांनी आपली कंपनी घेऊन सर्जिकल स्ट्राइक प्रकारची कारवाई करण्यासाठी एलओसीच्या पलीकडे अंदाजे एक किलोमीटर आतमध्ये जाण्याचे आदेश मिळाले. आणि त्या आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करीत त्यांनी पाऊल उचलले.. ते मागे न हटण्यासाठीच. शत्रूच्या ठाण्यावर थेट हल्ला चढवत ते शेकडो मीटर अंतर आत पुढे गेले. अंतराचा उल्लेख आवर्जून करण्याचे कारण म्हणजे प्रत्येक पावलागणिक तिथे शत्रूने भूसुरुंग पेरलेले होते. जमिनीखाली पुरलेले सुरुंग गवताने झाकलेले असल्याने सहज लक्षात येत नाहीत. त्यावर चुकून पाय पडला तरी माणूसच काय कोणतेही वाहन उडविण्याची क्षमता त्यामध्ये असते. त्यामुळे समोरून शत्रूला तोंड देत किंबहुना शत्रूवर हल्ला चढवत तशा मार्गावरू पुढे सरकणे म्हणजे... तारेवरच्या कसरतीपेक्षा भयंकर!
एव्हाना पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार आणि तोफांचा भडिमार सुरू झाला होता. त्यामध्ये एलओसीच्या अलीकडचे आणि पलीकडे जाऊन लढणाऱ्या भारतीय सैन्यातील एकूण 67 जवान देशाच्या कामी आले. त्यामध्ये सहा अधिकाऱ्यांचाही समावेश होता. बचावलेले काही जवान यशस्वीपणे भारतीय हद्दीत परतले. परंतु, पाकिस्तानने 32 जवानांना युद्धकैदी (प्रिझनर्स ऑफ वॉर) म्हणून ताब्यात घेतले. पुढे एका वर्षाने त्यांची सुटका झाली. पलीकडे गेलेल्या सैन्याचे नेतृत्व करणारे आमचे बहाद्दूर कंपनी कमांडर मेजर मेहमूद खानही पाकच्या हल्ल्यात जबर जखमी होऊन शहीद झाले. मात्र, त्यांचा मृतदेह सीमेपलीकडेच राहिला होता. देशाच्या कामी आलेल्या सैनिकाचा मरणोत्तर उचित सन्मान करणे हे आपले कर्तव्य असते.
त्यांचा मृतदेह परत आणणे महत्त्वाचे होते. ती जबाबदारी मी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीनंतर मी सहा जवानांना सोबत घेऊन सीमेपलीकडे जाऊन मृतदेहाचा शोध घेण्याचे नियोजन केले. एलओसी पार करण्याचा तो अनुभव म्हणजे मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखे होते. पलीकडे जाऊन आपल्या रेजिमेंटचे कंपनी कंमांडरचा मृतदेह अखेर आम्ही गोपनीयरीत्या शोधून काढला. आणि सूर्य उगविण्याच्या आत आम्ही भारताच्या हद्दीत परतलो. त्यावेळी सोबतच्या सहा जवानांसह मला खऱ्या अर्थाने पुनर्जन्मच मिळाला. मेजर खान यांच्या रुपाने आपला अधिकारी गमावल्याचे दुःख होते... देशाच्या कामी येत ते शहीद झाले याचा अत्यंत अभिमान वाटत होता.. आणि त्यांच्या हौतात्म्याला मरणोत्तर सन्मानपूर्वक सलामी देण्याची संधी मिळाल्याचे समाधान होते. त्यांना मरणोत्तर "वीर चक्र‘ प्रदान करण्यात आले.
हा प्रसंग रेजिमेंटच्या इतिहासात नमूद करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल त्यावेळी माझा महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
- कर्नल सुरेश डी. पाटील
(शब्दांकन- संग्राम शिवाजी जगताप)
सकाळ प्रकाशन मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016 - 04:00 AM IST
No comments:
Post a Comment