नाशिक - हवामान, भौगोलिक स्थान व संरक्षणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता, नाशिकमध्ये आयुध निर्माण कारखाना उभारण्याबरोबरच संरक्षण खात्याशी संबंधित प्रकल्प निर्माण करण्याचे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज उद्योजकांना दिले. संरक्षण खात्यात 49 टक्के परकी गुंतवणूक करण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आल्याने संरक्षण विभागाच्या सज्जतेत वाढ होणार आहे. याद्वारे संरक्षण क्षेत्रात भारत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी दिला.
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार नरेंद्र पवार, "नाईस‘चे अध्यक्ष विक्रम सारडा, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, "निमा‘चे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, आशिष नहार, "आयमा‘चे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, "निपम‘चे जे. के. शिंदे, इंडियन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मनीष कोठारी, डॉ. प्रशांत पाटील, सिटिटीझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, भाजपचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील उपस्थित होते.
डॉ. भामरे म्हणाले, की पूर्वीपासून स्नेहबंध असल्याने नाशिकच्या विकासाला सहाय्य करू. संरक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. 49 टक्के परकी गुंतवणूक हा त्यातीलच एक भाग आहे. परकी गुंतवणूक वाढणार असल्याचा फायदा नाशिकला होईल. गोवा येथील नियोजित हेलिकॉप्टर युनिट नाशिकला आणण्याच्या उद्योजकांच्या मागणीची दखल घेत डॉ. भामरे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नाशिकमध्ये आयुध निर्माण कारखाना, पब्लिक सेक्टर युनिटच्या माध्यमातून संरक्षण विभागाशी संबंधित उद्योग व फायटर एअरक्राफ्टच्या निर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. तत्पूर्वी, इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया व निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकला डिफेन्स हब व्हावे, तसेच संरक्षण उद्योग उभारण्याची मागणी केली. इंजिनिअरिंग क्लस्टरचे उपाध्यक्ष के. एस. पाटील यांनी आभार मानले. प्रारंभी टाटा ट्रस्टच्या स्किल एम्प्लॉयमेंट जॉब पोर्टलचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले.
फायटर एअरक्राफ्टची निर्मिती
ओझर येथील एचएएल कारखान्यात लढाऊ विमानांचे उत्पादन सुरू आहे. त्याबरोबरच आता अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन फायटर एअरक्राफ्टची निर्मिती केली जाणार आहे. लढाऊ विमानांची संरचना, विकास व उत्पादनही येथेच होणार आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात भारत व रशियात तसा करारदेखील झाला आहे. पण केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. "निमा‘च्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाकडे लक्ष वेधले असता, तातडीने अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अत्याधुनिक विमानांची निर्मिती सुरू झाल्यानंतर "एचएएल‘च्या कामात वाढ होईलच. शिवाय नाशिकमधील छोट्या व्यावसायिकांना कामे मिळणार असल्याने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीत चैतन्य निर्माण होईल.
- - सकाळ वृत्तसेवा
No comments:
Post a Comment