नौशेरा - देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या नियंत्रणरेषेवर डोळ्यांत तेल घालून सुरक्षा करणाऱ्या लष्कराच्या स्नॅपर्ससाठी "दुश्मन शिकार, हम शिकारी‘ हा सध्या कामाचा मूलमंत्र झाला आहे.
नियंत्रणरेषेवरील पाइनच्या झाडांवर अनेक ठिकाणी सध्या "दुश्मन शिकार, हम शिकारी‘ असे वाक्य लिहिलेले फलक लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गस्त घालणाऱ्या जवानांना हे फलक सहज दिसावेत अशा पद्धतीने ते लावले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक‘नंतर जवानांचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. सध्या पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी भंगाला त्याचप्रमाणे दहशतवाद्यांच्या घुसखोरीला जवान जबरदस्त प्रत्युत्तर देत शत्रूचे मनसुबे उधळून लावत आहेत.
सीमेवरील त्रिस्तरीय कुंपणाजवळ गस्त घालणारा एक जवान या फलकाबाबत म्हणाला, ""लक्ष्मणरेषेपलीकडे (नियंत्रणरेषा) बसलेला शत्रू म्हणजे माझी शिकार आहे आणि मी त्याचा शिकारी आहे. नियंत्रणरेषा ओलांडण्याचे दुःसाहस करणाऱ्यांना आम्ही या ध्येयवाक्याप्रमाणेच प्रत्युत्तर देतो.‘‘
नियंत्रणरेषेवर तैनात असलेल्या स्नॅपर्सना घुसखोरी करणाऱ्या शत्रूला जागेवर टिपण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नौशेरा हा नियंत्रणरेषेवरील प्रदेश हा घनदाट झाडी, खोल दऱ्या आणि कातळांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी गस्त घालणाऱ्या जवानांचे गरुडाच्या नजरेप्रमाणे सीमेवर लक्ष असते. ""पाकिस्तानी सैनिकांवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. "सर्जिकल स्ट्राइक‘मुळे ते अपमानित झाले आहेत. त्यामुळे सीमेवर आम्ही एक क्षणदेखील दुर्लक्ष करू शकत नाही,‘‘ असे एका जवानाने सांगितले. सध्या या नियंत्रणरेषेवर मानवी तसेच इलेक्ट्रॅनिक पद्धतीने चोवीस तास सतत टेहळणी करण्यात येते. सतत बदलणाऱ्या विपरित वातावरणात लष्करी जवान कमालीच्या दक्षतेने कार्यरत आहेत. "सर्जिकल स्ट्राइक‘नंतर पाकिस्तानने आतापर्यंत 26 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.
No comments:
Post a Comment