Saturday 8 October 2016

भारतीय हवाई दल: आकाशातील आकाशज्योती..! - विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे


वायुसेना दिन निमित्त भारतीय हवाई दलाच्या वैशिष्ट्याविषयी...

भारताच्या उत्तर व वायव्य आणि ईशान्य सीमेवर जगातील सर्वांत उंच, डोळे दिपवणारी हिमाच्छादित शिखरे आणि खाली घनदाट निबीड, अंधकारमय उष्ण-कटिबंधीय अरण्ये, तर कुठे तप्त-दग्ध वाळवंटे आहेत.

काश्‍मीर-लडाखपासून, अरुणाचल-नागालॅंड-मिझोरामपर्यंत, पहुडलेला हिमालय आणि पायथ्याचा पहाडी-विभाग. हा पर्वतीय प्रदेश, जगातील सर्वांत दुर्गम. याच भागात, आपल्या स्थलसेनेचे आणि अर्धसैनिक-बलांचे जवान तैनात असतात. रात्रंदिन, क्षणोक्षणी तळहातावर शिर घेऊन आपल्या सीमांचे रक्षण करतात. येथेच आपले आदिवासी बंधूदेखील राहतात.

या जवानांचे आणि जनजातीय बंधू-भगिनींचे दैनंदिन जीवन हे एक युद्धच असते. कधी झंझावाती वादळ वाऱ्यांशी, कधी मुसळधार पावसासी, कधी जीवघेण्या घनतम अरण्याशी, तर कधी रक्त आणि हाडे गोठविणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीशी! या परिस्थितीशी आणि शत्रूशी युद्ध सतत सुरू असते.
या सर्वांच्या जगण्याचा-जीवनाचा आधार फक्त एकच आशा! या आशेला आकाशमार्गे अतूट ठेवण्याची, चिरंजीव ठेवण्याचे काम करतात आपल्या भारतीय वायुसेनेचे अदम्य उत्साही वैमानिक आणि वायुयोद्धे. कधी शत्रूवर आणि त्यांच्या चौक्‍यावर आकाशातून अचूक मारा करून त्याला नामोहरम किंवा नष्ट करून. कधी आपल्या जवानांना आकाशमार्गे शस्त्रास्त्रे, दारुगोळा पोचवून, कधी या सर्वांना अन्न-धान्य, औषधपाणी आकाशमार्गे पुरवून.
रोज सूर्योदयाच्या पूर्वी, पक्ष्यांनाही जाग येण्याच्या आधी, आपले वैमानिक आपापली विमाने घेऊन, हिमालयावरून सीमांताकडे उड्डाण करतात. या प्रदेशातील कोंबडेही विमानाचा आवाज ऐकूनच आरवतात.

सीमा प्रदेशातील या दुर्गम विभागात डोंगर कापून छोट्या-मोठ्या धावपट्या बनविलेल्या आहेत. जेथे अगदीच जागा नव्हती, तेथे मिळेल तेवढ्या मोकळ्या जागेवर ‘‘ड्रॉपिंग-झोन्स‘‘ बनविलेले आहेत. या झोन्सवर विमानातून वरूनच सामान खाली ‘‘एअर-ड्रॉप‘‘ किंवा पॅरा-ड्रॉप करता येते.


भल्या मोठ्या भव्य महाकाय पर्वतांनी वेढलेल्या दऱ्यांमधील या हवाई-पट्ट्यावर विमान उतरवणे किंवा याहूनही अरुंद-खोल दऱ्यांमध्ये उतरून ‘‘ड्रॉपिंग-झोन‘‘वर सामग्री ‘‘एअर ड्रॉप‘‘ करणे फारच जोखमीचे काम; पण आता हा आपल्या वैमानिकांच्या दिनचर्येचाच भाग झालेला आहे.

मोठ्या विमानामधून रणगाडे किंवा मोठ्या हेलिकॉप्टरला खाली लटकवून जरूर पडते तेथे ‘‘जीप‘‘ आणि ‘‘जोंगा‘‘ या मोटरगाड्याही आकाशमार्गे पोचवल्या जातात. विमानातून निघून भल्यामोठ्या पॅराशूटच्या साह्याने आकाशातून हळूहळू खाली उतरणारी ‘‘जीप‘‘ बघणे हा परीकथेसारखा अनुभव असतो.

हिमालयीन आदिवासी-जनजातीय मुलांना शिकविणारे गुरुजी, त्यांच्या पाट्या पेंसिली, वह्या पुस्तके, विमानाद्वारे हवाई पट्ट्यावर उतरवून पोचविले जाते.

यांच्यासाठी सेनेचे डॉक्‍टरही विमानातून येतात आणि औषधपाणी, छोट्या-मोठ्या दुखण्यांचा इलाज तेथेच ताबडतोब केला जातो. गंभीर परिस्थितीत मात्र सैनिकांना व आदिवासी जनजातीय बंधू-भगिनींना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने त्वरित जवळच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पोचविण्यात येते. जास्त पेशंट्‌स असले, तर स्ट्रेचर्स लावून विमानाची किंवा हेलिकॉप्टरची ‘‘फ्लाइंग-ऍम्ब्युलंस तयार होते.

जेव्हा महापूर येऊन किंवा अतिवृष्टीमुळे प्रलय झालेला असतो, तेव्हा आपदग्रस्तांच्या सहायतार्थ त्वरित पोचतात. आपली विमाने व हेलिकॉप्टर्स पुरात बुडणाऱ्यांना, हेलिकॉप्टरमधून दोरखंडाची शिडी देऊन वर घेतले जाते व वाचविले जाते. विमानातून ‘‘लाइफ-बेल्ट‘‘ पाण्यात सोडले जातात. बुडणारे तरंगत राहावे व मदत येईपर्यंत जीवंत राहावे म्हणून.

महापुरात फसलेल्या जमिनीच्या उंचवट्यावर किंवा घरांच्या छतांवर अडकलेल्या मंडळींसाठी विमानामधून आणि हेलिकॉप्टर्समधून शिजवलेले अन्न, ब्रेड, बिस्किटे, कपडे, औषधे आणि पिण्याचे पाणीदेखील अचूक पुरवले जाते.

नुकतीच चेन्नईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरातील घटनाच बघा. दिवस भरलेली एक अगतिक गर्भवती पुरामुळे घराच्या छतावर अडकून पडलेली होती. तिला व घरच्यांना काय करावे काही सुचत नव्हते. एवढ्यात भारतीय वायुसेनेचे एक हेलिकॉप्टर वर येऊन भिरभिरू लागले. त्या मंडळींनी मदतीसाठी पुकारताच त्या महिलेला हळुवार-अलगद उचलून हॉस्पिटलमध्ये पोचविण्यात आले. बाळ-बाळंतीण सुखरूप. त्या कुटुंबात ‘लक्ष्मी‘ने अवतार घेतलेला होता.

भारतीय सशस्त्र सेनांचा, अन विशेषतः वायुसेनेचा दृष्टिकोन सदा मानवतावादीच असतो. अगदी युद्धातदेखील! ही आम्हा भारतीयांची आमच्या भारतीय सेनेची विशेषता आहे.

No comments:

Post a Comment