Tuesday, 21 March 2017

चंदूसाठी देशाची प्रार्थना देवानं ऐकली...

Indian solider Chandu Chavan's brother Bhushan

भारत-पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची नुकतीच सुटका झाली. चार महिने ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांचा भाऊ भूषण हा देखील भारतीय सैन्यात जवान आहे. चंदू पाकमध्ये अटकेत असताना इकडे भारतात भावाची तगमग सुरू होती. भूषण यांनी हा अनुभव शेअर केलाय eSakal.com चे प्रतिनिधी संतोष धायबर (santosh.dhaybar@esakal.com) यांच्यासोबत...

लष्करात कर्तव्य बजावत असताना म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदूला पाकिस्तानने पकडल्याचे समजले अन् पायाखालची वाळूच सरकली. काय करावे काय नको समजेनासे झाले. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. टीव्हीवरच्या बातम्यांवरून नातेवाईकांना माहिती समजली. फोन सुरू झाले. काही वेळानंतर चंदूबाबत आजीलाही समजले. आजीला धक्का सहन झाला नाही. हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिने प्राण सोडला. एका बाजूला भावाला पकडले, दुसऱया बाजूला आजीचे निधन झाले. बहिणीची प्रसुती आणि चार महिन्यांची गर्भावती असलेली पत्नी. सर्व बाजूंनी संकटं आली होती. परंतु, धीर एकवटला आणि परिस्थितीला सामोरे जात राहिलो.

पाकच्या ताब्यात असलेला चंदू आणि आजीचे निधनामुळे काय करावं, समजत नव्हतं. परंतु, भावाला सोडवायचंच हा ध्यास घेतला. सतत पाठपुरावा करत होतो. देशपातळीवर अनेकांच्या भेटीगाठी घेत होतो. चंदू नक्की भारतात परतणार, हे प्रत्येकजण सांगत होता. परंतु, जोपर्यंत त्याला पाहात नाही तोपर्यंत काही खरं नव्हतं. नको नको ते विचार मनात येत होते. वेळ द्या, इथेच चंदूला आणणार, असे संरक्षण राज्यमंत्री भामरे साहेबांनी घरात सांगितले होते. त्यांनी ते खरं करून दाखवले. भामरे साहेब आमच्यासाठी देवदूत आहेत. आमच्याकडून त्यांचे उपकार आयुष्यभर फिटू शकणार नाहीत.

चार महिन्यांच्या काळामध्ये अनेकांनी पाठिंबा दिला होता. ठिकठिकाणी धार्मिक विधी सुरू होते. अनेकजण पैशांच्या मदतीसाठीही पुढे येत होते. परंतु, मला केवळ माझा भाऊ सोडून काहीच दिसत नव्हते. चंदू कशाही अवस्थेत आला तरी त्याला आयुष्यभर सांभाळीन पण तो लवकरात लवकर यावा, हेच वाटत होतं.

चंदू पकडला गेल्यानंतर गावामध्ये सुन्न वातावरण होतं. गावामध्ये कोणताही सण साजरा केला जात नव्हता. गावातील प्रत्येक घरात फक्त बातम्यांचेच चॅनेल लावले जात होते. गावातील नागरिक एकतर टीव्हीपुढे नाहीतर देवळात बसलेले दिसायचे. परिसरात ठिकठिकाणी जप सुरू होते. गावकरी धार्मिक विधी करत होते. एका विद्यार्थीनीने तर नवरात्रात चंदूच्या सुटकेसाठी उपवास केले होते. शाळेच्यावतीने प्रार्थना करण्यात येत होती. बोरविहीर गावातील 99 विद्यार्थी व शिक्षक असे सर्वजण मिळून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आले होते. परंतु, काही कारणास्तव भेट होऊ शकली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते.

लष्करात सेवा बजावत असताना अचानक एका व्यक्तीनं जवळ येत 'भाऊ लवकरच परतणार' असं सांगितलं. त्या व्यक्तीनं अचानक सांगितल्यामुळे अंगावर काटा उभा राहिला. त्या व्यक्तीचा शब्द अखेर खरा ठरला आहे. प्रयत्नांती परमेश्वर या भावनेनं शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो; हार मानलीच नाही. सगळ्या बाजूंनी प्रयत्न सुरू होते. यश आलं...देशाची प्रार्थना देवाला ऐकावी लागली.

चंदू अमावस्येला गेला अन् पोर्णिमेला परतला...
पाकिस्तानने चंदूला पकडले तो दिवस अमावस्येचा होता. भारतात परतला तो दिवस पोर्णिमेचा होता. यामुळे आमचा चंदू अमावस्येला गेला अन् पोर्णिमेला परतलला असेच म्हणावे लागेल. चंदू गेला त्याच्या दुसऱया दिवशी बहिणीला मुलगा झाला आणि तो परतला आणि मला मुलगी झाली. मुलीच्या जन्मानं आमच्या घरात पुन्हा आजीने जन्म घेतला आहे, असंच वाटत आहे. गेल्या चार महिन्यांच्या काळात खूप काही सोसले. परंतु, शेवटपर्यंत आजोबा खचले नाही. फक्त... आज आजी पाहिजे होती.

'डॉन'चेही आभार..
चंदू पकडल्याचे वृत्त पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. 'डॉन'ने हे वृत्त प्रसारित केले नसते तर चंदूचा ठावठिकाणाच लागला नसता. शिवाय, भारतातील सर्वच प्रसारमाध्यमांनी शेवटपर्यंत चंदूसाठी मोठी साथ दिली. 'डॉन'बरोबरच या सर्वच प्रसारमाध्यमांचे आम्ही आभार मानतो.

संतोष धायबर

Esakal

No comments:

Post a Comment