ईशान्य हिंदुस्थानपासून मुंबईपर्यंत दहशतवादाचा धोका तसा जुनाच आहे . मात्र आता दिल्या गेलेल्या दोन ‘ ऍलर्ट ’ नी दहशतवादाच्या नव्या धोक्याचीही जाणीव करून दिली आहे . हा केवळ ‘ जाता जाता केलेला इशारा ’ नाही हे सरकार , सुरक्षा यंत्रणा , रेल्वेपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच समजून घ्यायला हवे .
आपल्याकडे दहशतवादी हल्ल्याचे ‘हाय ऍलर्ट’ अधूनमधून दिले जातच असतात.
विशेषतः स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच दहशतवादी पकडले जातात आणि दहशतवादी हल्ला ‘विफल’ वगैरे केला जातो. मात्र आता तसे काही नसतानाही एकापाठोपाठ एक असे दोन ऍलर्ट देण्यात आले आहेत. त्यापैकी एक आहे मोठय़ा संख्येने दहशतवादी हिंदुस्थानात घुसल्याचा आणि दुसरा आहे हिंदुस्थानी रेल्वेच्या घातपातासंदर्भात. हे दोन्ही इशारे वेगळ्या अर्थाने चिंताजनक आहेत. एकतर ईशान्य हिंदुस्थानात हजारोंच्या संख्येने दहशतवादी घुसणे गंभीर आहे. शिवाय पश्चिम बंगाल या नेहमीच्या मार्गाबरोबरच आसाम आणि त्रिपुरा या दोन राज्यांचाही घुसखोरीसाठी वापर करणे ही दुसरी चिंताजनक गोष्ट आहे. पुन्हा ही माहिती बांगलादेश सरकारनेच दिली आहे. आता शेजारी राष्ट्राचे ‘कर्तव्य’ त्या देशाने पार पाडले म्हणून त्यांचे आभार मानायचे की हिंदुस्थानात शिरण्याआधीच या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे किंवा कंठस्नान घालण्याचे ‘कर्तव्य’ बजावले नाही म्हणून त्या देशाला दोष द्यायचा? खरे म्हणजे धर्मांध मुस्लिम आणि विविध इस्लामी दहशतवादी संघटना यांच्या कचाट्यात बांगलादेशही भरडला जात आहे. त्यामुळे तो स्वतःच ‘ऍलर्ट’ राहिला असता तर ते त्यांचेही भलेच झाले असते आणि
हिंदुस्थानसमोर संकट
उभे ठाकले नसते. अर्थात, आता हे घुसखोर दहशतवादी काय किंवा हिंदुस्थानी रेल्वेला ‘घातपात’ घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी काय, दोघांचीही कार्यपद्धती बदलली असल्याने हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनाही वेगळ्या पद्धतीने विचार करणे भाग आहे. कारण बांगलादेशातून घुसलेल्या दहशतवाद्यांचा संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानात मोठा हिंसाचार घडविण्याचा इरादा असावा. एकट्या आसाममध्येच सहा महिन्यांत ‘जेएमबी’ या संघटनेचे ५४ दहशतवादी ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या दहशतवाद्यांनी आता हिंदुस्थानात घुसखोरी केली आहे त्यात याही संघटनेचा समावेश आहे. हे सर्व लक्षात घेऊनच केंद्र आणि त्या त्या राज्य सरकारांना उपाय योजावे लागणार आहेत. दुसरा ऍलर्ट मुंबई, मुंबईची लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसंदर्भात आहे. वास्तविक मुंबई आणि मुंबईची लोकल सेवा यांना असलेला दहशतवादाचा धोका जुनाच आहे. आजवर अनेक मुंबईकरांचे अशा हल्ल्यात बळी गेले आहेत. मात्र ताज्या इशाऱ्यानुसार दहशतवाद्यांची कार्यपद्धती वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि सामान्य प्रवासी अशा सगळ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. मध्यंतरी हिंदुस्थानी रेल्वेगाड्यांचे अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न झाले ते याच नव्या कार्यपद्धतीनुसार. पाटणा-इंदूर रेल्वेचा मोठा अपघात वगळता इतर प्रयत्न सुदैवाने असफल ठरले. शमशुल हुदा या दहशतवाद्याच्या अटकेमुळे
रेल्वेच्या ‘ घातपाती ’ अपघातांमध्ये
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चाच हात असल्याचेही उघड झाले. मात्र नेहमीच्या बॉम्बस्फोटांपेक्षा रेल्वे रुळांना ‘घातपात’ करून, रूळ कापून, त्यावर अवजड वस्तू ठेवून उपनगरी रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ‘अपघात’ घडवून आणण्याचे व त्यासाठी भिकारी, गर्दुल्ले यांचा वापर करण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न आहेत. हिंदुस्थानी रेल्वेचा पसारा आणि महाप्रचंड जाळे लक्षात घेता या सर्व हालचालींवर नजर ठेवणे, त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे आणि घातपाताचा प्रयत्न असफल करणे, रेल्वेमार्गावर ‘गस्ती पथके’ ठेवणे या सर्व उपायांवरही मर्यादाच आहेत. तरीही रेल्वे सुरक्षा दलांसह स्थानिक पोलीस, होमगार्ड, राखीव मनुष्यबळ यांचा यासंदर्भात कसा वापर करता येईल हे पाहायला हवे. रेल्वेमार्गांच्या आजूबाजूला महिनोन् महिने पडून राहणारे सामान, भंगार, जुने रेल्वे रुळ, पोलादी खांब या वस्तूच उद्या घातपातासाठी ‘साधन’ म्हणून वापरल्या जाऊ शकतात. त्याची ‘साफसफाई’ लवकर कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा. सध्या दोन्ही रुळांवर अडथळा आला तरच सिग्नल लाल होतो, त्याऐवजी एका रुळावर अडथळा आला तरी सिग्नल कसा लागेल यादृष्टीने तांत्रिक सुधारणा रेल्वेने करायला हवी. ईशान्य हिंदुस्थानपासून मुंबईपर्यंत दहशतवादाचा धोका तसा जुनाच आहे. मात्र आता दिल्या गेलेल्या दोन ‘ऍलर्ट’नी दहशतवादाच्या नव्या धोक्याचीही जाणीव करून दिली आहे. हा केवळ ‘जाता जाता केलेला इशारा’ नाही हे सरकार, सुरक्षा यंत्रणा, रेल्वेपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच समजून घ्यायला हवे.
Dailyhunt
No comments:
Post a Comment