Wednesday, 22 March 2017

लष्करी भरती प्रक्रियेचे पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे

नवी दिल्ली : लष्करी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली. पेपरफुटी फक्त पुणे विभागात झाली आहे आणि या प्रकरणाच्या तपासकामावर संबंधित लष्करी अधिकारी लक्ष ठेवून आहेत, असेही भामरे म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणावर ते बोलत होते.

भविष्यात पेपर फुटू नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने अंबाला, चेन्नई आणि जयपूरमध्ये लष्करी भरती प्रक्रियेची परीक्षा घेणार असल्याचे भामरे यांनी राज्यसभेत सांगितले.

परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार होती, मात्र पेपर फुटल्याचे लक्षात येताच भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती भामरे यांनी दिली. पेपरफुटीची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला (ठाणे क्राईम ब्रँच) मिळाली होती. मिळालेल्या माहितीआधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गोवा, नागपूर आणि पुणे येथे छापे टाकले होते, असे भामरे यांनी सांगितले.

पेपरफुटीच्या मुद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. पेपरफुटी प्रकरणाचा संबंध त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गोव्याशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरशी असल्याच्या मुद्याकडे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले. लष्करी भरतीचा पेपर फुटणे हे लष्कराच्या सुरक्षा यंत्रणेचे अपयश असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

पेपरफुटी प्रकरणी स्थानिक पातळीवर पोलीस चौकशी करत आहेत तसेच लष्करी अधिकाऱ्यांनीही उच्चस्तरिय चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून पेपर फोडणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले. परीक्षेच्या आयोजन प्रक्रियेत नेमकी कुठे गडबड झाल्यामुळे पेपर फुटला हे तपासले जात आहे, असे भामरे म्हणाले.

मध्य प्रदेशमध्ये झालेला व्यापमं घोटाळा आणि लष्कर भरती प्रक्रियेदरम्यान झालेली पेपरफुटी या दोन्हीत साम्य असल्याचे काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी सांगितले. हा एक मोठा कट असल्याचे ते म्हणाले.

सामना

No comments:

Post a Comment