अफाट लष्करी सामर्थ्य, एवढ्या फौजा, निमलष्करी दले सारे काही असताना हिंदुस्थानसारखा महाकाय देश मूठभर नक्षलवाद्यांचा रक्तपात हतबलपणे पाहतो, असेच चित्र देशवासीयांनी गेली अनेक वर्षे पाहिले. सुकमामध्ये १२ जवानांचे प्राण घेणाऱ्या ताज्या नक्षली हल्ल्यानंतर तरी हे चित्र बदलायला हवे!
सुकमातील रक्तपात !
शनिवारी सकाळी अवघा देश उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल टीव्हीवर बघण्यात दंग असताना तिकडे छत्तीसगडगध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे बारा जवान नक्षलवाद्यांच्या भयंकर हल्ल्यात शहीद झाले.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा गेल्या काही वर्षांत जणू नक्षलवाद्यांचे नंदनवनच बनला आहे. नक्षलवादी दाट जंगलातून कधीही येतात, जवानांवर, निरपराध लोकांवर हल्ले चढवतात आणि रक्तपात करून झाल्यावर बंदुका नाचवीत निघूनही जातात. असे हल्ले झाल्यानंतर मोठी कुमक जंगलात पाठवायची, शहीद जवानांची शव गोळा करायची आणि राज्यकर्त्यांनी श्रद्धांजल्या अर्पण करायच्या हे सारेच आता सगळ्यांच्या सरावाचे झाले आहे. आताही वेगळे काही घडले नाही.
छत्तीसगडमध्ये जवानांच्या रक्ताचा सडा पाडून नक्षलवादी पसार झाले आणि जवानांवर आपल्याच सहकाऱ्यांची पार्थिव वाहून नेण्याची वेळ आली. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ल्यासाठी सुकमा जिल्हाच टार्गेट केला आहे. या जिह्याच्या भेज्जी आणि इंजरम या दोन गावांदरम्यान रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. या मार्गाच्या सुरक्षेची आणि तिथे काम करणाऱ्या लोकांच्या जीविताची काळजी घेण्याची जबाबदारी सीआरपीएफच्या बटालियनवर सोपविण्यात आली होती.
एकंदर ११२ जवान या गस्ती पथकात सहभागी होते. सकाळच्या सुमारास रस्त्याची तपासणी करून रस्ता खुला करण्यासाठी जवानांचे हे पथक निघाले असतानाच रस्त्यालगतच्या घनदाट झाडीत लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी डाव साधला. पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांचे अनेक स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी जवानांच्या संपूर्ण पथकाला घेरले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जवान आधी गोंधळले. मात्र जिवाची पर्वा न करता अंगावर गोळ्या झेलतच जवानांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. तुंबळ धुमश्चक्रीनंतर जवानांनी नक्षलवाद्यांच्या टोळक्याला पिटाळून लावले खरे, पण जाता जाता अनेक जवानांच्या रायफली आणि राखीव दलाचे रेडिओ सेट नक्षलवाद्यांनी पळवले. या भयंकर हल्ल्यात राखीव दलाचे बारा जवान धारातीर्थी पडले.
यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. मात्र दुर्दैव असे की निवडणूक निकालांच्या कोलाहलात जवानांनी घनदाट जंगलात दाखविलेले शौर्य आणि त्यांचे हौतात्म्य हरवून गेले. या भयंकर हल्ल्याचे वार्तांकन निकालांपुढे खुजे ठरले. वास्तविक गेल्या काही दिवसांत दहशतवाद थांबला, कश्मिरातील दगडफेक थांबली आणि नक्षलवादी हल्ले बंद झाले असे आभासी चित्र देशवासीयांच्या मनावर बिंबवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.
तथापि यापैकी काहीही थांबलेले नाही, हे गेल्या दोन महिन्यांत वारंवार स्पष्ट झाले. सुकमा जिल्ह्यातील ताजा नक्षली हल्ला हे तर नक्षलवाद थांबल्याच्या बाजारगप्पांवर ओतलेले झणझणीत अंजनच म्हणावे लागेल. इस्लामी दहशतवादाप्रमाणेच माओवाद्यांच्या नक्षली कारवायांनी देश पोखरण्याचे काम सुरू आहे, हे वास्तव आहे. ते नाकारण्यापेक्षा निरपराधांवर आणि आपल्या जवानांवर उठणारे हात कलम करून रक्ताला चटावलेल्या या चळवळीची चुळबूळ कायमची कशी संपुष्टात आणता येईल, या दृष्टीने आता विचार व्हायला हवा.
नक्षलवादी हल्ल्यांचे आणि त्यात गेलेल्या बळींचे सरकारी आकडे अस्वस्थ करणारे आहेत. गेल्या बावीस वर्षांत १३ हजारांहून अधिक लोकांचे बळी नक्षलवाद्यांनी घेतले आहेत. यामध्ये तीन हजार जवान आणि दहा हजार निरपराध लोक मारले गेले. मागच्या तीन वर्षांतही ५१० सामान्य लोक आणि सुरक्षा दलांचे २१२ जवान नक्षली हल्ल्यात मरण पावले.
महाराष्ट्रासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यांतील एकंदर २०० जिल्हे आजघडीला नक्षलग्रस्त आहेत. आता तर जंगलांमधून बाहेर पडलेले नक्षली संघटनांचे कमांडर मोठ्या शहरांमध्ये आपली पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरगरीबांची दिशाभूल करून त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र देणाऱ्या नक्षली चळवळीचे संकट इस्लामी दहशतवादापेक्षाही मोठे आहे. अफाट लष्करी सामर्थ्य, एवढ्या फौजा, निमलष्करी दले सारे काही असताना हिंदुस्थानसारखा महाकाय देश मूठभर नक्षलवाद्यांचा रक्तपात हतबलपणे पाहतो, हे चित्र देशवासीयांनी गेली अनेक वर्षे पाहिले.
सुकमामध्ये १२ जवानांचे प्राण घेणाऱ्या ताज्या नक्षली हल्ल्यानंतर तरी हे चित्र बदलायला हवे!
Dailyhunt
No comments:
Post a Comment