लाहोर : भारतीय स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८६ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी पाकिस्तानात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या तिघांच्या अन्यायकारक हत्येबद्दल ब्रिटनच्या महाराणींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी या निमित्ताने केली.
भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने लाहोरच्या फव्वारा चौकात गुरुवारी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिन्ही स्वातंत्र्यसैनिकांना याच चौकात २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. ब्रिटनच्या महाराणींनी शादमान चौकाचा दौरा करून, या तिघांच्या हत्येबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.
या कार्यक्रमात एक ठराव संमत करण्यात आला. महाराणींनी अन्यायकारक हत्येबद्दल आर्थिक भरपाई देण्याशिवाय भारत-पाकिस्तानची, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची माफी मागायला हवी, असे कार्यकर्त्यांनी या ठरावात म्हटले आहे. या वेळी भगतसिंग यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कॅनडा आणि भारतातून दूरध्वनीवरून भाषणही केले. या कार्यक्रमाला धार्मिक कट्टरवाद्यांकडून धोका असल्यामुळे लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहर पोलिसांनी कार्यक्रमाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली होती. (वृत्तसंस्था)
'आम्ही शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे साहस आणि त्यांचे बलिदान विसरणार नाही. सिंग यांचा आवाज प्रत्येक साम्राज्यवादी सरकारविरुद्ध घुमत राहील, असे भगतसिंग फाउंडेशन पाकिस्तानचे अध्यक्ष अब्दुल्ला मलिक यांनी म्हटले.
शादमान चौकाचे 'शहीद भगतसिंग चौक' असे नामकरण न केल्याबद्दल त्यांनी पंजाब सरकारवर टीकाही केली. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांसारखे लोक कधीकधीच जन्मतात. त्यांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज कुरेशी यांनी म्हटले.
No comments:
Post a Comment