नवी दिल्ली : येत्या ३१ डिसेंबरनंतर पॅन कार्ड क्रमांकास आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. या जोडणी अभावी तुमचा पॅन क्रमांकच अवैध ठरू शकतो. आधार विस्तार व्यापक करण्यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलत आहे.
सूत्रांनी सांगितले की, सध्या सर्व करदात्यांना तसेच प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना पॅन क्रमांक बंधनकारक आहे. ओळखीचा पुरावा म्हणूनही अनेक जणांकडून पॅनकार्डचा वापर केला जातो.
तथापि, सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक पॅन कार्डे खोटी व बोगस माहिती देऊन मिळविण्यात आली आहेत. आधार कार्ड जोडणी केल्यास बनावट पॅन क्रमांक आपोआप रद्द होतील. डिसेंबरनंतर ती अवैध ठरविण्याचा सरकारचा विचार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पॅनला आधारशी जोडण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर ही तात्पुरती अंतिम तारीख ठरविली आहे. या वर्ष अखेरपर्यंत आधार नोंदणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तारीख ठरविण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, आजघडीला १.0८ अब्ज भारतीयांनी आधार नोंदणी केली आहे.
स्टेंट बँक आॅफ इंडियाचे मुख्य समूह आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, ९८ टक्के प्रौढ नागरिकांकडे आधार कार्ड असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्ष अखेरची मुदत व्यवहार्य ठरते.
लोकमत न्यूज नेटवर्क
No comments:
Post a Comment