Friday, 24 March 2017

पहिल्या गोरखा बटालियनचे द्विशताब्दी वर्ष साजरे

नवी दिल्ली - ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या नऊ गोरखा बटालियनपैकी पहिल्या बटालियनचे यंदा द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या बटालियनची स्थापना 1817 मध्ये करण्यात आली होती. द्विशताब्दी वर्षानिमित्ती सिकंदराबाद येथे 16 मार्च 2017 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बटालियनमधील जवानांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेक मोठे, महत्वपूर्ण आणि मानाचे पुरस्कार या बटालियनला मिळाले आहेत. अनेक "व्हिक्‍टोरिया क्रॉस', पाच "महावीर चक्र' आणि सतरा 'वीरचक्र' मिळवणाऱ्या लष्करी जवान, अधिकाऱ्यांनी गेल्या दोन शतकात बटालियनलाही गौरव प्राप्त करुन दिला.

या बटालियनच्या रेजिमेंटसनी देशात डेराबाबा नानक, जम्मू आणि काश्‍मीर याबरोबरच अफगाणिस्तान, फ्रान्स, उत्तर आफ्रिका, बर्मा अशा विविध देशांमधूनही कर्तव्य बजावले.
द्विशताब्दी वर्षानिमित्त या बटालियनच्या एका पथकाने लडाख क्षेत्रातले कांगडी शिखर (6,153 मीटर उंची) सर करण्याचा विक्रम केला. तसेच मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या बटालियनच्या माध्यमातून आत्तापर्यंत 32 हजार नेपाळींनी भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचे काम या बटालियनने केले. बटालियनच्या द्विशताब्दी समारोहामध्ये नेपाळमधून 500 पेक्षा जास्त निवृत्त जवान उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाला पंजाबचे माजी राज्यपाल, जनरल बी. के. एन. छिब्बर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment