Monday, 3 October 2016

पाकव्याप्त काश्‍मीरात पाकविरुद्ध मोठे आंदोलन

मुझफ्फराबाद - पाकव्याप्त काश्‍मीरमधील कोटली येथील नागरिकांनी नुकतेच पाकिस्तानी सैन्याकडून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अनन्वित अत्याचारांसंदर्भात मोठे आंदोलन केले. पाकिस्तानी सैन्य आणि पाक गुप्तचर संस्था आयएसआयकडून येथील "काश्‍मीरच्या आझादी‘साठी कार्यरत असलेल्या नेत्यांविरोधात केल्या जाणाऱ्या शिरकाणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ""आयएसआयपेक्षा कुत्रे जास्त एकनिष्ठ असतात‘‘; वा ""काश्‍मिरींचे हत्याकांड घडविणारे कसाई पाकिस्तानी सैन्य,‘‘ अशा आशयाच्या घोषणाही आंदोलकांकडून देण्यात आल्या.

पाकव्याप्त काश्‍मीरमधील एक मुख्य काश्‍मिरी राष्ट्रवादी नेते असलेल्या अरिफ शाहिद यांच्या झालेल्या हत्येची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. 62 वर्षीय शाहिद यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांविरोधात तीव्र लढा दिला होता. 2013 मध्ये रावळपिंडी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमागील सूत्रधार अजूनही सापडलेले नाहीत. अर्थात शाहिद यांची हत्या आयएसआयनेच घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाकव्याप्त काश्‍मीरमधील 100 पेक्षाही जास्त राजकीय कार्यकर्ते-नेत्यांची हत्या आयएसआयने गेल्या अवघ्या दोन वर्षांत घडविली असल्याचा अंदाज मुझफ्फराबादमधील सर्व पक्षीय राष्ट्रीय आघाडीने वर्तविला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या क्रूर गुन्ह्यांविरोधात येथील काश्‍मिरी जनतेमधील संताप वाढत आहे. 

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment