Monday, 3 October 2016

भारताच्या पाठीशी आता दोन 'सुपरपॉवर'

लक्ष्यवेधी हल्ल्याचे रशियाकडून समर्थन; पाकच्या धमकीचा अमेरिकेकडून निषेध
नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाकी पडला असून, अमेरिकेप्रमाणेच रशियानेदेखील भारताचे समर्थन केले आहे. भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेली लक्ष्यवेधी हल्ल्याची कारवाई योग्यच असल्याचे रशियाने म्हटले असून, पाकने भारतास दिलेल्या आण्विक हल्ल्याच्या धमकीचा अमेरिकेनेही कठोर शब्दांत निषेध केला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा वाद मिटविण्यासाठी आता संयुक्त राष्ट्रसंघानेही पुढाकार घेतला असून, याबाबत "युनो‘चे सरचिटणीस बान-की-मून यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे.

रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की ‘दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आम्ही भारतासोबत आहोत, विद्यमान स्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तानने विनाकारण संघर्ष चिघळू देऊ नये. उभय देशांमधील तणावामुळे आम्ही चिंतीत असून, त्यांनी राजनैतिक मार्गांनी समस्यांवर तोडगा काढावा.‘‘ काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली होती. अमेरिकेने याची गंभीर दखल घेतली असून, पाकचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे ओबामा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानने काहीही वक्तव्य केले तरीसुद्धा आमचे त्यांच्या शस्त्रसंपदेवर बारीक लक्ष असल्याचेही एका अमेरिकी अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले.
लष्करप्रमुखांची मुख्यालयास भेट
सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी आज लष्कराच्या उत्तर आणि पश्‍चिम विभागाच्या मुख्यालयास भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधत काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीबाबतही चर्चा केल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. उरीचा बदला म्हणून भारताने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी लष्कराच्या उत्तर मुख्यालयाकडे सोपविण्यात आली होती. या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे सिंह यांनी अभिनंदनही केले.
अखनूरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानच्या सैनिकांनी पुन्हा भारताची कुरापत काढत अखनूर सेक्‍टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानने आज केलेला गोळीबार क्षुल्लक होता असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताच्या लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार सीमेवर गोळीबार करतो आहे. पाकच्या गोळीबाराची ही चौथी घटना होती. दरम्यान उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी लष्कराने अंतर्गत चौकशी करायला सुरवात केली असून ब्रिगेडियर सोमशंकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
अण्वस्त्रसंपन्न देशांवर मोठी जबाबदारी असून उरीतील दहशतवादी हल्ल्याचा आम्ही आधीच निषेध केला आहे. उभय देशांनी त्यांचा तणाव सामोचाराच्या माध्यमातून दूर करावा.
- मार्क टोनर, परराष्ट्रमंत्रालयाचे उपप्रवक्ते
भारताच्या लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघातून कोणताही पाठिंबा मिळालेला नाही तसेच युनोच्या शस्त्रसंधी उल्लंघनाचे निरीक्षण करणाऱ्या समुहानेही याची दखल घेतलेली नाही.
- सय्यद अकबरूद्दीन, "युनो‘तील भारताचे स्थायी प्रतिनिधी

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment