Monday 3 October 2016

सीमेवर लढणारे जवान हे देशाचे खरे ‘हिरो‘ – नाना पाटेकर

पुणे : "जेव्हा दोन देशांत संघर्ष निर्माण होतो, तेव्हा सर्वांत आधी देशाकडे पाहायचे असते. देशाचा विचार करायचा असतो. कलाकार देशापेक्षा मोठे नाहीत,‘‘ असे मत व्यक्त करत अभिनेते नाना पाटेकर यांनी सलमान खानवर रविवारी टीका केली. आताच्या स्थितीत पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देऊ नये, असेही ते म्हणाले.


भारत-पाकिस्तानात तणावाची स्थिती असताना "पाकिस्तानातील कलाकार म्हणजे दहशतवादी नाहीत‘, असे वक्तव्य सलमानने नुकतेच केले होते. या पार्श्‍वभूमीवर नाना पत्रकारांशी बोलत होते. "सीमेवर लढणारे जवान हे देशाचे खरे  ‘हिरो‘ आहेत. स्वत:ला ‘हिरो‘ म्हणवून घेणारे आम्ही सगळे कलाकार नकली आहोत. जवानांपेक्षा मोठे कोणी नाही; पण आम्ही मोठे आहोत म्हणवणाऱ्या कलाकारांना अजिबात महत्त्व देऊ नका. सलमान काय म्हणतो किंवा "बॉलिवूड‘ काय म्हणते हे महत्त्वाचे नाही. कलाकार हे देशासमोर काहीच नाहीत. कलाकारांपेक्षा देश महत्त्वाचा आहे,‘‘ असे नानांनी सांगितले.

"भारतातील पाकिस्तानी कलाकारांचे काय करायचे, हा निर्णय सरकारचा आहे. कुठल्या तरी पक्षाने किंवा संघटनेने रस्त्यावर उतरून या संदर्भात भूमिका घेणे चुकीचे आहे. हा पूर्णपणे राजकीय निर्णय आहे. तो कायद्यानुसार घेतला जाऊ शकतो,‘‘ असेही नानांनी सांगितले.
"मी कुठल्या समाजाचा आहे, हे मला माहिती नाही. कधीही मागण्या मांडाव्या, असे वाटले नाही,‘‘ अशा शब्दांत मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी आपले मत थोडक्‍यात मांडले.

No comments:

Post a Comment