नवी दिल्ली - भारताने कधीच दुसऱ्या देशावर आक्रमण केलेले नाही तसेच आम्हाला इतर देशांची जमीन बळकावण्याचीदेखील हाव नाही. जेव्हा गरज भासली तेव्हा आमच्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. मोदींच्या या वक्तव्यास भारत-पाकिस्तान संघर्षाची किनार आहे.
भारताने कधीही भूप्रदेशासाठी अन्य देशांवर हल्ला केला नाही; पण दोन जागतिक युद्धांमध्ये (ज्याचा भारताशी कधीही प्रत्यक्ष संबंध नव्हता.) आमच्या दीड लाखांपेक्षाही अधिक शूर सैनिकांनी बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्घाटन समारंभामध्ये बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.
भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर उभय देशांतील परराष्ट्र संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. भारतीय जवानांनी मोठे बलिदान दिले असले तरीसुद्धा आम्ही ते जगाच्या लक्षात आणून देऊ शकलेलो नाही. मी जेव्हा परदेशामध्ये जातो, तेव्हा आवर्जुन हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मारकांना भेट देतो असेही मोदी यांनी नमूद केले. परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना राजकीय सत्तेत काडीचाही रस नसतो. ते अन्य समुदायामध्ये सहज मिसळतात. परदेशामध्ये राहणारे भारतीय हे पाण्यासारखे असतात, गरजेनुसार आपला रंग आणि आकार बदलतात, असेही मोदी यांनी सांगितले.
भीती दूर करा
जगभरातील असंख्य देशांमध्ये भारतीय समुदाय ताकदवान असून तेथे त्याने अन्य लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमच्या देशातील लोकांच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर झाल्यास सध्या निर्माण झालेले ‘ब्रेन ड्रेन’चे रूपांतर ‘ब्रेन गेन’ध्ये होईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने धरणातील पाण्याचा विद्युतनिर्मितीसाठी वापर केला जातो त्याच प्रमाणे दोन कोटींपेक्षाही अधिक अनिवासी भारतीयांच्या शक्तीची भारतास प्रकाशमान होण्यासाठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले
- - पीटीआय
No comments:
Post a Comment