Wednesday 12 October 2016

लष्कर व जवानांना साथ द्या - बच्चन - वृत्तसंस्था

मुंबई - "पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे हे महत्त्वाचे नसून, सर्व भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जिवाची बाजी लावणारे आपले जवान व लष्कराला साथ देणे गरजेचे आहे, असे आवाहन बिग "बी‘ अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी केले. 

बच्चन यांनी आज 74 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकरांवर बंदी घालण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष करीत आहेत, त्यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. ""सध्याच्या वातावरणात हा प्रश्‍न उपस्थित करणे योग्य नाही. कोण, कोठे, काय, केव्हा म्हणाले यापेक्षा अशा अवघड काळात लष्कराच्या पाठीशी राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगून अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केलेल्या भावनांचा पुनरुच्चार केला.

""सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशा वेळी आपले जवान व लष्काराशी आपण एकनिष्ठ राहायला हवे. याशिवाय अन्य काही महत्त्वाचे नाही,‘‘ असे बच्चन म्हणाले. कलाकारांवर बंदी घालणे योग्य आहे का, या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, ""प्रत्येक कलाकाराचा मी आदर करतो.‘‘
संगीतमय आदरांजली नाही
उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना तुम्ही संगीतातून आदरंजली वाहणार हे खरे आहे का, असे विचारल्यावर त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, ""हे खरे नाही. मी दिल्लीत असताना एका खासदाराने मला हनुमान चालिसा, गणपती आरती याबद्दल माहिती दिली व हे मी गावून उरीतील हुतात्म्यांना त्यातून आदरांजली अर्पण करावी, अशी इच्छा व्यक्त केली. मला असे करण्यास आवडेल असे मी सांगितले. मात्र याबाबत पुढे काही घडले नाही.‘‘

No comments:

Post a Comment