Sunday 17 February 2019

लेख : ईशान्येतील वाढत्या चिनी कारवाया


>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

चीनच्या दबावास भीक न घालता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशला 9 फेब्रुवारी रोजी भेट दिली. त्यावर चीनने घेतलेला आक्षेप आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने धुडकावून लावला हे योग्यच झाले. हिंदुस्थानी पंतप्रधानांच्या अरुणाचल भेटीस आक्षेप घेणे हे चीनचे नेहमीचेच आहे. चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट मानतो आणि तो आपल्याच देशाचा भाग आहे, असे त्याचे म्हणणे आहे. आपण चीनशी या सीमेसंदर्भात 21 वेळा चर्चा केली आहे. पण चीन अरुणाचलचा हेका सोडायला तयार नाही. चीनच्या या विस्तारवादास ठामपणे विरोध करत राहणे हाच एक मार्ग आहे.

देशाला भेडसावणाऱया अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी आणि तिथला हिंसाचार फारच कमी झाला आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान हे तेथील बंडखोरी वाढवण्याचा आता प्रयत्न करत आहेत. त्यात मुख्य भूमिका निभावत आहे तो परेश बरुआ आणि त्यांची दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. बांगलादेशी घुसखोरी ही आसाम आणि ईशान्य हिंदुस्थानात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढली होती. ती थांबवण्यासाठी ही संस्था निर्माण झाली. आसाम गण परिषद यांचीच एक संलग्न संस्था होती. त्यांनी बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यासाठी दहशतवाद सुरू केला. या संघटनेचे तळ आणि प्रशिक्षण केंद्रे सुरुवातीला चीनमध्ये होती. चीनने हाकलून देत त्यांना बांगलादेशात तळ ठोकायला भाग पाडले. बांगलादेशामध्ये हसीना वाजेद यांचे सरकार आल्यापासून त्यांना दम देऊन जी दहशतवादी कृत्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-बांगलादेशी घुसखोरांविरोधात करत होती ती थांबवण्यास भाग पाडली. शेवटी ते बांगलादेशातील तळ हलवून म्यानमारमध्ये गेले. आता ही संघटना घुसखोरांविरुद्ध न बोलता ईशान्य हिंदुस्थानात स्थायिक झालेल्या किंवा कामासाठी आलेल्या इतर हिंदुस्थानींविरुद्ध हिंसाचार करते. काही महिन्यांपूर्वी उल्फाच्या बंडखोरांनी सहा बिहारी लोकांना मारले होते.

अर्थात आपल्या सैन्याने केलेल्या अभियानामुळे ईशान्य हिंदुस्थानमध्ये असलेल्या इतर दहशतवादी गटांची क्षमता फारच कमी झालेली आहे. तिथे दोन मोठे गट आहेत. पहिला म्हणजे एनएससीएन खपलांग जो हिंदुस्थान सरकारविरुद्ध अजूनही कारवाया करू इच्छितो. त्यांचा नेता खपलांग याचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या जागी कोनयाक हा हिंदुस्थानी नागा आला. हा हिंदुस्थानी नागा वाटाघाटीकरिता तयार होता म्हणून एमएससीएनकेने त्याला काढून टाकत त्याच्या जागी याँग औग या म्यानमारी नागाला मुख्य बनवले. त्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करायचे ठरवले आहे. चीनने परिस्थितीचा फायदा घेत नागा बंडखोर आणि मणिपूरमधील बंडखोर गट त्यांना उल्फाच्या बरोबर एकत्र येऊन एक संयुक्त दहशतवादी संस्था स्थापन करण्यास भाग पाडले आहे. त्याचे नाव आहे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न साऊथ ईस्ट एशिया (यूएनएलएफडब्ल्यू). ही संस्था ईशान्य हिंदुस्थानातील सर्वच बंडखोर गटांना उल्फाच्या नेतृत्वाखाली आणून हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करण्यास भाग पाडत आहे.

आताच हिंदुस्थान सरकारने ठरवले आहे की, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सप्रमाणे पकडल्या गेलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांमध्ये बांगलादेशातून आलेले हिंदू आणि इतर अल्पसंख्याक ख्रिश्चन, बौद्ध यांना हिंदुस्थानी नागरिक बनवणार आहे. हे कारण पुढे करून या गटांनी हिंदुस्थानविरोधात हिंसाचार करायचे ठरवले आहे. ईशान्य हिंदुस्थानातील हिंसेच्या आकडेवारीकडे पाहिल्यास 2014 सालाआधी प्रत्येक वर्षी 350 ते 500 सुरक्षाकर्मी, बंडखोर आणि सामान्य नागरिक मारले जात. 2018 मध्ये ही संख्या 50 हून कमी झाली आहे. म्हणजेच हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. मात्र आता सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र करून हिंसाचार वाढवण्याचा चीनचा कुटील डाव आहे. यामध्ये सामील आहेत ते उल्फा, नागालँडचा खपलांग समूह, नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आणि मणिपूरमधील काही दहशतवादी गट जसे पीपल्स रिह्युलन्स पार्टी, कम्युनिस्ट पार्टी इत्यादी आहेत.

यापैकी बहुतेक संघटनांचे तळ म्यानमारमध्ये आहेत, परंतु म्यानमारमधील सरकारने आता खपलांग गटाशी शांतता चर्चा केल्याने ते आता म्यानमारविरुद्ध कारवाई करणार नाहीत. ते केवळ हिंदुस्थानविरुद्धच दहशतवादी कृत्ये करण्यासाठी वापरले जाणार आहेत. चीनच्या मदतीने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा आपला आवाज उठवण्यासाठी तयारी केली आहे. या समूहाची लढण्याची क्षमता 200 ते 300 दहशतवादी इतकी असू शकते. त्यांनी ईशान्य हिंदुस्थानमध्ये बंडखोरी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये त्यांना थेडेफार यश मिळाले आहे.

हिंदुस्थानने चीनशी संवाद साधत परेश बरुआ या उल्फाच्या प्रमुखाला हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे असे सांगितले होते. मात्र चीनने नकार दिला आहे. उलट कम्युनिस्ट पक्ष माओवादी दहशतवादी संघटना मध्य हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करते. चीन माओवादी आणि ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानविरोधी गट एकत्र येतात तेव्हा त्यांची प्रशिक्षण देण्याची आणि शस्त्रसाधने, युद्ध सामग्री देण्याची क्षमता आणि आर्थिक क्षमता वाढते.

गेल्या महिन्यात ब्रह्मपुत्रेवरील चौथ्या मोठय़ा पुलाची निर्मिती गेल्या चार वर्षांत पूर्ण झाली आहे. त्याचे नाव बोगिबिल. ईशान्य हिंदुस्थानातील दळणवळण साधनांची निर्मिती वेगवान आणि उत्कृष्टपणे केली जात आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीला मोठा वाव ईशान्य हिंदुस्थानमध्ये मिळणार आहे. मात्र हीच गोष्ट नको असल्याने ईशान्य हिंदुस्थानची ही प्रगती थांबवण्यासाठीच हिंदुस्थानचे शत्रुदेश चीन आणि पाकिस्तान ईशान्य हिंदुस्थानात पुन्हा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदुस्थानी सैन्य याविरोधात आक्रमक कारवाया करून हिंसाचार करण्याआधीच त्यांना नेस्तनाबूत करण्यामध्ये किंवा पकडण्यात यश मिळवेल. यासाठी उत्कृष्ट गुप्तहेर माहितीचीसुद्धा गरज आहे. टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर करून अशा गटांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंसाचार होण्याआधी बंडखोर गटांवर हल्ला करून हिंसाचार आधीच थांबवता येईल.

No comments:

Post a Comment