पुलवामा येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी युद्धाची मागणी देशभरातून होत आहे. सरकारकडून याबाबत कुठल्याही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. मात्र युद्धाचा निर्णय झाल्यास नौदल आणि हवाई दल सध्या सज्ज आहे. स्फोटके, क्षेपणास्त्र यांनी सुसज्ज असलेल्या नौदलाच्या युद्धनौका ...
महाराष्ट्र टाइम्स | Updated:Feb 17, 2019, 09:22AM IST
vayu shakti 2019: सुरक्षा दलांची सज्जता
म. टा. प्रतिनिधी, मुंबई/वृत्तसंस्था, पोखरण (राजस्थान)
पुलवामा येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी युद्धाची मागणी देशभरातून होत आहे. सरकारकडून याबाबत कुठल्याही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. मात्र युद्धाचा निर्णय झाल्यास नौदल आणि हवाई दल सध्या सज्ज आहे. स्फोटके, क्षेपणास्त्र यांनी सुसज्ज असलेल्या नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात तळ ठोकून आहेत. तर, हवाई दलाने पोखरणच्या वाळवंटात 'वायुशक्ती' या नावाने अहोरात्र युद्धसराव सुरू केला आहे.
समुद्री संरक्षणाबाबत नौदलाद्वारे सध्या भूदल व हवाई दलाच्या सहकार्याने 'ट्रोपेक्स' या संयुक्त कसरती देशाच्या समुद्रात सुरू आहेत. या कसरतींसाठी नौदलाच्या सर्व प्रमुख युद्धनौका शस्त्रसामग्रीने सज्ज झाल्या आहेत. त्यांचा समुद्रात कसून सराव सुरू आहे. त्यामध्ये पश्चिम नौदल कमांडमधील युद्धनौकांचाही समावेश आहे. या नौका अरबी समुद्रात तळ ठोकून आहेत. नौदलातील सूत्रांनी सांगितले की, एरवी सरकारने युद्धाची हाक दिल्यास सज्जतेसाठी सर्वाधिक सहा महिन्यांचा कालावधी नौदलाला लागतो. युद्धनौकांमध्ये स्फोटके चढविणे जोखीमयुक्त असल्याने वेळ लागतो, पण सध्या ट्रोपेक्समुळे नौका सज्ज आहेत, हे महत्त्वाचे.
हवाई दल २४ तास सज्ज
युद्धाचे आदेश आल्यास सर्वात कमी कालावधी हवाई दलाला लागतो. हवाई दलाची अनेक लढाऊ विमाने राजस्थान व पंजाबमधील सीमेवरील तळांवर कायम तैनात असतात. या तळांवर धावपट्टीच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन विमाने क्षेपणास्त्रे व बॉम्बसह २४ तास तैनात असतात. याखेरीज देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून लढाऊ विमानांना सीमेवर हलविण्यास सर्वात कमी कालावधी लागतो. याच जोडीला हवाई दलाने शनिवारपासून 'वायुशक्ती' हा पूर्वनियोजित दिवसरात्र युद्धसराव राजस्थानमध्ये पाकिस्तान सीमेपासून जवळ असलेल्या पोखरण येथे सुरू केला आहे. सरकारकडून कोणताही आदेश आल्यास हवाई दल तयार असल्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी शनिवारी या युद्धसरावाचा शुभारंभ करताना पाकिस्तान किंवा पुलवामा हल्ल्याचा उल्लेख न करता सांगितले. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे देखील उपस्थित होते. या युद्धसरावामध्ये १४० लढाऊ जेट विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टरचा सहभाग आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही वापर या सरावात केला जात आहे.
No comments:
Post a Comment