काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी CRPF जवानांवर हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर सोशल मीडिया आणि टीव्हीवर जी चर्चा झाली, त्या चर्चेचा एकंदर सूर असा होता की या हल्ल्याचा बदला घेण्यात यावा. या सर्व चर्चेपासून वेगळी, एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, ती आहे डी. पी. सिंग यांची.
मेजर डी. पी. सिंग हे भारतीय लष्कराचे एक निवृत्त अधिकारी आहेत. कारगील युद्धात हिमतीने लढताना त्यांनी आपला पाय गमावला होता.
त्यांनी आपल्या पेजवर प्रसिद्ध केलेल्या या पोस्टचं भाषांतर या ठिकाणी देत आहोत.
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हुतात्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आहेत. या क्रूरतेचा बदला घ्यायला हवा. काही दिवसानंतर सारं काही शांत होईल आणि ज्या लोकांचं रक्त सध्या सळसळत आहे, ते लोकही देखील पूर्वपदावर येतील.
राजकीय पक्ष, मीडिया हाऊस आणि सर्वसामान्य लोकही शांत होतील. पण ज्या कुटुंबीयांनी आपल्या जीवलगांना गमावलंय, त्यांचं दुःख कुणी समजू शकणार नाही. एक सैनिक तिरंग्यासाठी सर्वस्व अर्पण करतो.
- पुलवामा : CRPF जवानांवर हल्ला करणाऱ्यांना मोदींनी काय इशारा दिला?
- पुलवामा : बुलडाण्याचे दोन्ही जवान 4 दिवसांपूर्वीच पुन्हा ड्युटीवर रुजू झाले होते
पण काही प्रश्न आहेत आणि वेळेनुसार त्यांचं गांभीर्य आणखी वाढत चाललं आहे. आपण असं काही करू शकतो का, जेणे करून पूर्ण व्यवस्था सुधारेल?
शुक्रवारी मी एका न्यूज चॅनेलवर झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. त्या चर्चेत भावनाप्रधान वक्तव्य करण्याऐवजी तर्कावर आधारित विचार मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो. टीव्ही अॅंकर म्हणाली की "कदाचित तुम्ही पुलवामा हल्ल्याचे फोटो पाहिले नाहीत. त्यामुळे आपण माझ्या मताशी सहमत नाहीत. या प्रश्नाचं एकच उत्तर आहे ते म्हणजे बदला."
आता मी या गोष्टीच्या पलीकडे गेलोय. ती महिला अँकर जे काही बोलत होती, त्याचं मला आश्चर्यही नाही वाटलं. कदाचित त्यांना माहीत नसेल की काही वर्षांपूर्वी मी एका युद्धात जखमी झालो होतो. जेव्हा त्या अॅंकरनं माझी ओळख करून दिली तेव्हा तिला हेदेखील ठाऊक नव्हतं की मी लष्करात रॅंक वन मेजर होतो.
मी तिला म्हणालो की एक सैनिक नेहमीच तिरंग्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार होतो. पण याच वेळी आपल्याला हे देखील समजून घ्यायला हवं की वकास कमांडो (पुलवामा हल्ला घडवून आणणारा जैश-ए-मोहम्मदचा जहालवादी) सारखं वागण्याऐवजी आपण डबल सेना मेडल आणि अशोक चक्र विजेता काश्मिरी तरुण लांस नायक नजीर वाणीला आपलं आदर्श म्हणून ठेवावं.
आपल्याला या मुद्द्याकडेही लक्ष द्यावं लागेल. जर आपला माथेफिरू शेजारी आपल्या घरात येऊन आपल्या तरुणांना भडकावत असेल आणि त्याला थांबण्यात आपल्याला अपयश येत असेल तर याचा अर्थ आहे की कुठेतरी आपलंही चुकतंय.
40 कुटुंबं बेचिराख झाली. जर आपण या प्रश्नाच्या तोडग्याकडे वळलो नाही तर भविष्यात आणखी कुटुंबं बेचिराख होतील. जेव्हा तुम्ही 'बदला-बदला' म्हणून ओरडत आहात, तेव्हा त्या कुटुंबीयांना विचारून पाहा की ते आपल्या हिरो सैनिक, म्हणजेच आपला पती, पिता किंवा मुलाशिवाय आयुष्य जगायला तयार आहेत का?
जोपर्यंत पुढची पिढी सकारात्मक रीतीने गोष्टी समजून घेणार नाही, तोपर्यंत बदल घडणार नाही. हल्ला, बदला, त्यांचा बदला आणि आपला बदला, या गोष्टी अजून सुरूच आहेत. त्या अॅंकरला तर्काधिष्ठित बनण्यासाठी थोडा वेळ लागला आणि थोड्या वेळानंतर पूर्ण पॅनल माझीच भाषा बोलू लागलं.
आपल्या विचारांशी इतर लोकांनी सहमत व्हावं म्हणून काही अॅंकर्स त्यांचे विचार आपल्या डोक्यात टाकायचा प्रयत्न करतात. त्यांच्याच तालावर इतर भोळे लोक नाचू लागतात आणि त्यांच्याशी सहमत होतात.
आपल्याला वाटतं की सैनिक शहीद व्हावेत, पण त्यांच्या विधवांना पेन्शनसाठी दारोदार भटकावं लागतं. काहींना तर हे सिद्ध करावं लागतं की त्यांचा पती शहीद झाला आहे. त्यांना सांगितलं जातं, की 'त्यांचा मृतदेह मिळाला नाही, तुम्ही आधी तो घेऊन या.'
आपल्याला वाटतं सैनिकांचे प्राण जावे, पण मलाच माझं पेन्शन मिळण्यासाठी किती कष्ट करावे लागले कसं सांगू. पेन्शनसाठी मला विकलांग अवस्थेत सात वर्षं संघर्ष करावा लागला. मी युद्धातच जखमी झालो आहे, याचा पुरावा मला द्यावा लागला. कोर्टात अशी शेकडो प्रकरणं पेंडिंग आहेत.
मेजर नवदीप सिंह आणि खासदार राजीव चंद्रशेखर यांच्याबरोबर मी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांना भेटलो. त्यांनी वचन दिलं होतं की जानेवारी अखेरीपर्यंत युद्धात जखमी होऊन विकलांग झालेल्या सैनिकांविरोधातले अनावश्यक खटले परत घेतले जातील. जानेवारी संपला, पण ते वचन अजून पूर्ण झालं नाही. खटले अजून सुरू आहेत.
आपल्याला वाटतं की सैनिकांनी प्राण गमवावे, पण जेव्हा स्वकीयांना वाचवण्याची वेळ येते तेव्हा सैनिकांवर केस केली जाते. कारण त्यांनी एका दगडफेक करणाऱ्याला जीपला बांधलं होतं.
ही यादी संपता संपणार नाही. कुणाच्या जिवाची अशी थट्टा करू नका.
तुमचा व्यवसाय वाढावा, तुमची प्रगती व्हावी म्हणून इतरांच्या भावनांशी खेळू नका.
भारतीय लष्कर आणि CRPFला ठाऊक आहे की केव्हा काय करायचं आणि कधी करायचं. ही गोष्ट लष्करानं याआधीच सिद्ध केली आहे. परिस्थिती कशी हाताळायची ते त्यांना ठाऊक आहे. पण सर्वांना बोलायचा अधिकार आहे, अशा वेळी हे कोण लक्षात घेतं की सैनिकांना नंतर वाऱ्यावर सोडून दिलं जातं.
जय हिंद.
(लेखक निवृत्त लष्करातले निवृत्त मेजर आहेत. या लेखात व्यक्त केलेले विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)
- पुलवामा हल्ल्यांवर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही आहे प्रतिक्रिया...
- पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडं कोणते पर्याय आहेत?
- पुलवामा हल्ल्यावरील वक्तव्य भोवलं, सिद्धू यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी
- पुलवामा : 'जैश ए महंमद'वर पाकिस्तान कारवाई का करत नाही?
source: bbc.com/marathi
No comments:
Post a Comment