Sunday, 17 February 2019

मुंबईत संतापाची लाट


सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 16) अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आणि बाजार बंद ठेवण्यात आले. हे निषेधसत्र रविवारीही (ता. 17) सुरू राहणार आहे. नालासोपारा येथे शनिवारी निदर्शकांनी सुमारे दोन तास रेल्वे वाहतूक अडवल्यामुळे अनेक उपनगरी व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी दादर पूर्व, काळबादेवी, वरळी, ग्रॅण्ट रोड, क्रॉफर्ड मार्केट, मालाड आदी ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून निषेध फेऱ्या काढण्यात आल्या. लायन्स ग्रुपने दादर येथे घेतलेल्या "एक सही देशासाठी' या मोहिमेत नागरिकांनी निषेधाचे संदेश लिहिले. या वह्या पंतप्रधानांना पाठवल्या जातील.

गोरेगाव रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला दीनदयाळ समाजसेवा केंद्र, राजहंस प्रतिष्ठान, पोलिसमित्र, नवउत्कर्ष मंडळ, संस्कार भारती, गोरेगावकर नागरिक, यूथ वर्ल्ड फाऊंडेशन या संघटनांतर्फे निषेध सभा घेण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) चेंबूर विभागाचे अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चेंबूर येथे निदर्शने करत पाकिस्तानचा झेंडा जाळला. माटुंगा येथील एसआयईएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुपारी मैदानात जमून दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

मालाडमधील मालवणी, ट्रॉम्बे-चिता कॅम्प परिसरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या भागांतील हॉटेले, दुकाने व दवाखानेही बंद होते. मालवणीत अनेक शिक्षण संस्थांमधील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी निषेध मोर्चे काढले. चिता कॅम्प येथे नागरिकांनी अनवाणी पायांनी व दंडाला काळ्या फिती बांधून मूक मोर्चा काढला. मानखुर्द रेल्वेस्थानकात रेल रोकोचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी दूर केले.

नालासोपाऱ्यात रेल रोको
नालासोपारा येथे शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास निदर्शकांनी रेल्वेमार्गावर ठाण मांडल्याने वाहतूक बंद पडली. चर्चगेट ते वसईपर्यंतच उपनगरी गाड्या धावत होत्या. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून आंदोलकांना पांगवल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रेल्वे सेवा सुरू झाली. परंतु, सायंकाळपर्यंत रेल्वेगाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. उपनगरी गाड्यांच्या 54 फेऱ्या रद्द झाल्या, तर लांब पल्ल्याच्या 14 गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले. काही गाड्या मधल्या स्थानकांवर खंडित कराव्या लागल्या.

आज मुंब्रा-कौसा बंद
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काही संघटनांनी रविवारी (ता. 17) मुंब्रा-कौसा बंदचे आवाहन केले आहे. माटुंगा सिटिझन्स फोरमतर्फे सकाळी 10 वाजता माटुंगा स्थानकापासून दादरपर्यंत निषेध मोर्चा काढला जाईल.

No comments:

Post a Comment