Sunday 17 February 2019

साद-पडसाद: प्रत्येकानेच बनावे सैनिक

जयेश राणे

पुलवामातील घटनेनंतर आता देशांतर्गत सुरक्षा सक्षम करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करता येईल, हे पाहणे अनिवार्य झाले आहे. दिवसेंदिवस सीमेवरील संघर्षात होणारी वाढ त्या आवश्‍यकतेकडे लक्ष वेधते. यामुळे शत्रूलाही लक्षात येईल की भारताचे सैनिकच नाही तर त्यांचे नागरिकही लढण्यास सज्ज आहेत. परिणामी शत्रूचे कंबरडे मोडण्यासाठी सैन्यास अधिक हिंमत मिळेल. या प्रकरणी गंभीरतेने विचार झाला पाहिजे.

अतिरेकी, नक्षलवादी सैनिक आणि पोलीस यांवर प्राणघातकी आक्रमण करत आहेत. त्यामुळे जायबंदी होणे, गंभीरपणे घायाळ होणे, हुतात्मा होणे या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. भारतामध्ये अशांतता पसरवण्यासाठी देशविघातक शक्‍तींचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच असतात. काही दिवसांच्या अंतराने वा सलग काही दिवस आक्रमण करणे अशी त्यांची आक्रमण करण्याची नीती असल्याचे वेळोवेळी लक्षात येते. सुरक्षेच्या दृष्टीने काश्‍मीरमध्ये कायम संवेदनशील स्थिती असते. कुठे, कधी काय होईल, याची निश्‍चिती देता येत नाही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून कडक पहारा ठेवण्याचे कडवे आव्हान सैनिकांसमोर असते.

काश्‍मीरमधील पुलवामाच्या संतापजनक घटनेविषयी बोलताना निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी काश्‍मीरच्या स्थितीविषयी असे सांगितले की, 'हे धर्मांध लोक आहेत. पाकिस्तान स्वतः सांगत आहे. भारताशी लढण्याची आमच्यात ताकद नाही. त्यासाठी दर आठवड्याला लॉंच पॅडवरून ते दोन घुसखोर पाठवतात. आत्मघातकी आक्रमण करणारे येताना एक-दोन जण येतात आणि आमच्या अनेक जवानांचे बळी घेतात. आक्रमण करण्यासाठी येणारे हे मारणे, मरणे यांसाठीच आलेले असतात. ही पाकिस्तानची खेळी आहे. भूज ते सियाचीनदरम्यान 10 लाख सैन्य उभे आहे. आम्ही रक्‍तबंबाळ होत आहोत. एवढ्या सैन्याचा खर्चही पुष्कळ आहे.' त्यांचे हे विधान लक्षवेधी आहे.

काश्‍मीरमधील आक्रमणे याच प्रकारे होत आहेत. एक-एक सैनिक हुतात्मा होतो, तेव्हा देशप्रेमी जनतेचे काळीज तुटते. तेव्हा निवृत्त सैनिकांच्याही भावना किती संतप्त असतील, हे समजणार नाही. निवृत्त सैनिकांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत कारण त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर शत्रूशी दोन हात केलेले असतात. सैनिकांवर होत असलेल्या आत्मघातकी आक्रमणाविषयीही होत असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोप यांचा नागरिकांना उबग आला आहे. प्रश्‍न पडतो की, आमच्या सैनिकांच्या वाट्याला असे दु:ख का? सर्व बाजूंनी इस्लामी राष्ट्रांनी इस्त्रायल हा छोटासा देश वेढलेला आहे. पण त्याचा रोखठोक बाणा सर्वश्रुत आहे. ज्या दिशेने गोळी, बॉम्ब येतात, त्या दिशेला प्रत्युत्तर दिले जाते.

'पाकिस्तानशी सरळ दोन हात करा', असे देशातील जनता टाहो फोडून सांगत आहे. तरीही आजपर्यंत या लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकला गेलेला नाही. एका बाजूने देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहे. तर दुसऱ्या बाजूने शत्रूकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे पिचत आहे. त्यामुळे देशाची प्रगती शत्रूच्या कारवायांपुढे झाकोळली जात आहे. भारताच्या प्रगतीने पोटशूळ उठणारे शत्रू देशाला कधीच स्वस्थ बसू देणार नाही. ते कुरापती काढत राहून प्रगतीस गालबोट लावण्याचे दुष्कर्म करत राहणार. भारतावर आक्रमणांची टांगती तलवार कायम कशी राहील याचे व्यवस्थित नियोजन शत्रू करत आहे. शत्रूशी युद्ध केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेस धोका पोहोचेल, देश काही दशके मागे जाईल, त्यावेळी देशांतर्गत सुरक्षा कशी राखायची, असे अनेक प्रश्‍न भारत सरकारसमोर असतील. 'प्रश्‍न आहे तिथे उत्तर आहेच,' या सूत्रांवर अमेरिकेपेक्षा उत्तम उदाहरण नाही. हा देश प्रगतीची उंच शिखरे सर करतच आहे, सोबतच जगाची डोकेदुखी ठरलेल्या जिहादी आतंकवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शत्रूवर सतत आक्रमणे करून त्यास नामोहरमही करत आहे.

भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कुरापतींना वेळीच चोख उत्तर देत असले तरी असे केव्हापर्यंत सुरू राहणार? हा प्रश्‍न देशवासीयांना सतावतो आहे. आयुष्यातील वाईट काळ लवकर संपावा असे प्रत्येकास वाटत असते. अतिरेक्‍यांच्या माध्यमातून राष्ट्रावर काही दशके कायम असलेल्या वाईट काळाचा पगडा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होते आहे. आक्रमण करूनच शत्रूला जगाच्या नकाशावरून नष्ट करावे लागणार आहे. तरच हे राष्ट्रीय संकट दूर होणार आहे. या संकटाच्या कचाट्यात जवानांचे बळीच जात नाही आहेत, तर त्यांच्या शरीराची विटंबनाही करण्यात येत आहे. अशा जवानांच्या कुटुंबीयांचे दु:ख कुठल्याही सांत्वनाने भरून येणार नाही.

देशाच्या सुरक्षा यंत्रणांना लक्ष केले जात आहे. जिथे सैनिक, पोलीसच सुरक्षित नाही तिथे नागरिकांची सुरक्षा कोण करणार, असा संदेश त्या यंत्रणांवरील आक्रमणांच्या माध्यमातून देशामध्ये सतत जात राहील असे पाहिले जात आहे. सैनिक आणि नागरिक यांवर असुरक्षिततेचा मानसिक दबाव टिकवून ठेवण्यासाठी शत्रू खेळत असलेल्या डावपेचांना हरताळ फासण्यासाठी देशातील नागरिकांना सैन्यासोबत राहणे अत्यावश्‍यक आहे. शत्रूचा कशाप्रकारे पाडाव करता येतो, याचे कैक दाखले भारताने अनेक वीर, महाराजे आणि झाशीची राणी यांच्या पराक्रमी कर्तृत्वातून अनुभवले आहेत. ते कर्तृत्व जागृत करण्यासाठी त्यांच्या पराक्रमी गाथांचा गांभीर्याने अभ्यास होण्याची नितांत गरज भासत आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी रयतेत प्रचंड आकर्षण होते, आजही आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीही होते. त्यांच्या पराक्रमाने रयतेतील युवा वर्ग प्रेरित झाला होता. त्यामुळे स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती होत होती. ज्या ज्या गावी छत्रपती संभाजीराजे जात होते. तेव्हा तेथील युवा वर्ग आम्हालाही आपल्या सैन्यात सामील करून घ्या, असा मनोदय त्यांच्यासमोर व्यक्‍त करत असत. त्याला छत्रपती संभाजी महाराजही होकार देत होते. अशा स्वराज्यप्रेमी रयतेच्या साथीनेच दोन्ही पिता-पुत्र यांनी पाच पातशाह्यांना धूळ चारली आहे.

सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. पण आज अशी स्थिती आहे की, नागरिकांनाही शत्रू सोबत लढण्यास सज्ज राहावे लागणार आहे. म्हणजेच नागरिकांनाही सैनिकच बनावे लागणार आहे. 130 कोटींहून अधिक जनसंख्या असलेल्या भारताने याविषयी जागृती करण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. देशाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीत वाढ होण्यासाठी आटापिटा करणे अनिवार्य असते. त्यासह सीमेवर जसा धुमाकूळ घालण्यात येत आहे तसाच देशात पसरलेल्या अतिरेक्‍यांच्या जाळ्याच्या सहाय्यानेही घालण्याचे शत्रूचे मनसुबे त्यामुळे धुळीस मिळतील. त्यामुळे देशात लपून बसलेले पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर यांच्या मुसक्‍या आवळणे शक्‍य होईल. राष्ट्रसेवा हे केवळ सैनिकांचे दायित्व नाही, तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे.

No comments:

Post a Comment