पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारत कोणाचे नाव घेत नाही, मात्र या देशाचे कोणी नाव घेतले तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ही संयम ठेवण्याची वेळ आहे. लवकरच दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यात येईल.
महाराष्ट्र टाइम्स | Updated:Feb 17, 2019, 07:56AM IST
लवकरच प्रत्युत्तर देऊ
म. टा. वृत्तसेवा, धुळे
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारत कोणाचे नाव घेत नाही, मात्र या देशाचे कोणी नाव घेतले तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ही संयम ठेवण्याची वेळ आहे. लवकरच दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यात येईल. शहीद सैनिकांच्या प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी धुळे येथे दिली.
धुळे शहरातील गोशाळेच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती जिल्ह्यातील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार हीना गावित, ए. टी. पाटील, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी अहिराणी बोलीतून भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, 'आठे जमेल तमाम खान्देशी भाऊ-बहिणीसले मन:पूर्वक नमस्कार.' यानंतर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धाजंली वाहिली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या हल्ल्यामध्ये ज्या जवानांना बलिदान द्यावे लागले, त्यांच्या कुटुंबांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, शहीद कुटूंबाला एकच सांगणे की तुमच्या डोळ्यांतील जेवढे अश्रू गेलेत, त्याचे पूर्णपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता कोणतीही कसर सोडली जाणार नाही. सर्व बदला घेऊ. मात्र, आता शांत राहून संयम ठेवणे गरजेचे आहे.
रेल्वेमार्गाचे भूमिपूजन
प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे-नरडाणा, जळगाव-मनमाड नवीन रेल्वेमार्ग, जळगाव-उधना दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे भूमिपूजन तसेच भुसावळ-वांद्रे (खान्देश एक्स्प्रेस), नंदुरबार-उधना मेमू ट्रेन व उधना-पाळधी मेमू ट्रेन या विकासकामांचा व्हिडीओ कॉन्फरसद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत अक्कलपाडा धरणातून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटारी आणि केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेंतर्गत निम्न पांझरा मध्यम अक्कलपाडा प्रकल्प या हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभदेखील करण्यात आला.
No comments:
Post a Comment